---Advertisement---

हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर

On: शनिवार, जुलै 18, 2020 8:17 PM
---Advertisement---

भारतामध्ये क्रिकेटला जो दर्जा आहे, तो इतर कोणत्याही खेळाला जगात कोठे नसेल. क्रिकेटबद्दल भारतामध्ये जी क्रेझ पाहायला मिळते त्याला तोडच नाही. खेळाडूंना देवासारखे पूजले जाते. भारतीय खेळाडू कोठेही जावो त्यांच्यामागे हजारोंच्या संख्येने क्रिकेट चाहते असतात.

भारतीय संघाने विजय मिळाल्यावर जल्लोषाला पारावर उरत नाही. जर भारतीय संघाचा पराभव झाला तर मग मात्र टीकादेखील केली जाते. भारतीय खेळाडूंवर थोडावेळ राग धरतात पण विरुद्ध संघाच्या मॅचविनर खेळाडूला मात्र शिव्यांची लाखोली वाहिली जाते.

असाच एक खेळाडू जो दरवेळी भारतीय संघाला अडचणीत आणायचे काम करत. भारतीय खेळाडू आणि त्याचे कसे संबंध होते हे कोणी सांगू शकत नाही. पण, भारतीय प्रेक्षक आणि त्या खेळाडूचा छत्तीसचा आकडा होता आणि तो खेळाडू म्हणजे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज हेन्री ओलोंगा.

केनियन पिता आणि झिम्बाब्वीयन आईच्या पोटी ३ जुलै १९७६ रोजी झांबिया या देशात हेन्रीचा जन्म झाला. हेन्रीला आधीच १२ सावत्र भावंडे होती. झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय रग्बी संघाचा माजी कर्णधार विक्टर ओलोंगा हा हेन्री ओलोंगाचा सावत्र भाऊ आहे.

हेन्री लहानपणापासूनच खूप हुशार होता. अभ्यासासोबतच कला, संगीत आणि खेळांमध्ये त्याला विशेष रुची होती. जेव्हा त्याचे कळायचे वय झाले तेव्हा त्याने स्वप्न पाहिले की, आपण एक दिवस ऑलम्पिक खेळू आणि केनियासाठी मेडल जिंकू. केनिया त्याच्या वडिलांचा देश असल्याने त्याला तिकडे ओढ होती.

शाळेमध्ये इतर मुले क्रिकेट खेळत असल्याने त्याला क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. त्याला वेगवान गोलंदाजी करणे पसंत होते. तासनतास तो गोलंदाजी करत. त्याच्या आवडीने व सरावाने तो उत्कृष्ट गोलंदाज बनला.

१९९५ मध्ये पाकिस्तान संघ झिंम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात हेन्रीला झिंबाब्वेसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याचे वय अवघे १८ वर्ष होते. तेव्हा झिंबाब्वेसाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार खेळाडू तसेच झिंबाब्वेसाठी खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली होती.

हेन्रीने झिंबाब्वेसाठी पदार्पण केले आणि पहिलेच षटक टाकताना सईद अन्वरला बाद देखील केले. पण पंचांनी तो चेंडू फेकतो म्हणून पुढे गोलंदाजीच करू दिली नाही. केवळ पहिल्या डावात १० षटकं त्याने गोलंदाजी केली. झिम्बाब्वेच्या पहिल्यावहिल्या कसोटी विजयाचा भाग असून नसल्यासारखा तो झाला.

पुढे, हेन्रीला दिग्गजांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डेनिस लिली, क्लाईव्ह राईस आणि जोएल गार्नर यांचा समावेश होता. तिघांनीही हेन्रीची गोलंदाजीची शैली ठीक करण्यात त्याची मदत केली. पुढील एका वर्षात पुन्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला. याच बरोबर झिम्बाब्वेच्या १९९६ च्या विश्वचषक संघात देखील त्याचा समावेश करण्यात आला.

झिंबाब्वेने ज्यावेळेस विदेशी भूमीवर आपला पहिला कसोटी विजय मिळविला, त्या विजयाचा नायक होता हेन्री ओलोंगा. ज्या पाकिस्तान विरुद्ध त्याची कसोटी कारकीर्द काहीश्या दुर्देवी रीतीने सुरू झाली होती, त्याच पाकिस्तानला पेशावर कसोटीत धूळ चारण्यात ओलोंगाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. दुसऱ्या डावात त्याने पाकिस्तानचे इंजमाम, सईद अन्वर, आमीर सोहेल व अझर मेहमूद हे दिग्गज फलंदाज बाद केले.

ओलोंगोला खरी प्रसिद्धी मिळाली ती भारताविरुद्ध केलेल्या दमदार कामगिरीमुळे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला असता ओलोंगाने हरारे कसोटीत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकावत भारताला पराभूत करण्यात हातभार लावला होता.

तो असा काळ होता, जेव्हा झिंबाब्वे संघ हा भारताला नडणारा संघ म्हणून प्रसिद्ध झाला होता. भारतात तेव्हा एखाद्या मुलाने केस वाढवले तर त्याला ‘काय रे! स्वत:ला काय ओलोंगो समजतोय काय?’ एवढी ओलोंगोची क्रेझ निर्माण झाली होती. ९०च्या दशकातील असे क्रिकेटप्रेमी सापडणार नाहीत, ज्यांना हा गोलंदाज माहित नव्हता.

शारजामध्ये १९९८ साली कोकाकोला कपमध्ये शानदार गोलंदाजीने २०५ धावांचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच जबर धक्के दिले. त्याने सचिन, द्रविड आणि गांगुलीला झटपट बाद करत झिंबाब्वेला तेरा धावांनी विजय मिळवून दिला होता. याच कोकाकोला कपच्या अंतिम सामन्यात मात्र सचिनने, मागचा सगळा हिशोब चुकता करत ओलोंगाच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली होती. त्या सामन्यात सचिनने केलेली ओलोंगाची ही धुलाई कोणताच क्रिकेटप्रेमी आणि खुद्द ओलोंगादेखील विसरला नाही. हा अंतिम सामना भारताने १० विकेट राखून जिंकला होता. सचिनने अवघ्या ९२ चेंडूत आक्रमक १२४ धावा बनवल्या होत्या.तर, ओलोंगाचे गोलंदाजी पृथःकरण होते ६-०-५०-०

यानंतरही ओलोंगा हा भारताला जडच गेला. १९९९ च्या विश्वचषकातदेखील ओलोंगाने भारताला परत एक जखम दिली.

झिम्बाब्वेने दिलेले २५३ धावांचे आव्हान भारत जवळपास पूर्ण करता आला होता. प्रत्येकी ४६ षटकांचा असलेल्या या सामन्यात भारताला २ षटकांत ७ धावांची आवश्यकता होती. ४५ वे षटक टाकण्यासाठी हेन्री ओलोंगा आला. भारताच्या अजूनही तीन विकेट बाकी होत्या. रॉबिन सिंग ३५ धावांवर खेळत होता. ओलोंगाने त्या षटकात रॉबिन सिंगसह व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ यांना बाद करत झिम्बाब्वेला तीन धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला.

२०००-२००१ दरम्यान झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनी वंशवादाचा मुद्दा पुढे करत झिम्बाब्वे क्रिकेट संघात कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्याचे ठरविले. ग्रॅन्ट फ्लावर आणि हेन्री ओलोंगा यांनी त्याला विरोध दर्शविला. हे दोन्ही खेळाडू २००३ विश्वचषका दरम्यान झिंबाब्वेमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीच्या दमनाला विरोध म्हणून दंडावर काळी पट्टी बांधत विरोध दर्शवत होते. काहींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले, तर काही जवळच्याच मुगावे यांच्या विचारसरणीला मानणाऱ्या लोकांनी नापसंती दाखवली.

२००३ विश्वचषकानंतर ओलोंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. अखेरीस त्याने झिंबाब्वे सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये त्याने आपल्या आवडीच्या संगीत क्षेत्रात प्रवेश केला. इंग्लंडमधील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ” द ऑल स्टार टॅलेंट शो” या स्पर्धेच्या २००६ सालच्या पर्वाचा हेन्री विजेता ठरला.

ऑस्ट्रेलियामधील तारा रीड या तरुणीशी विवाह केल्यानंतर ओलोंगा २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला. सध्या हा ४४ वर्षीय माजी क्रिकेटपटू चर्च म्युझिक या प्रकारात गाणी तयार करून आपले बस्तान बसवत आहे.

३० कसोटी व ५० वनडे खेळलेल्या व अतिशय छोट्या कारकिर्दीत, मोठे नाव कमावलेला हा वेगवान गोलंदाज राजकारणामुळे आणि आपल्या तत्वांशी बिलकुल हे तडजोड न केल्याने, क्रिकेट पासून कायमचा दूर झाला.

वाचा- गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---