इंग्लंडचा 2016 सालचा भारताचा दौरा सर्व क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील. भारताच्या ऐतिहासिक विजयासोबतच या दौऱ्यात सर्वात जास्त चर्चा झाली होती ती युवा फलंदाज करुण नायरची. मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपला अवघा तिसरा कसोटी सामना खेळत असलेल्या करुणने अविश्वसनीय फलंदाजी करत आक्रमक त्रिशतक झळकावले होते.
अनपेक्षित संधी
2016 साली झालेल्या मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई येथे खेळला गेला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-0 ने विजयी आघाडी मिळवली होती. मालिका सुरू होण्यापूर्वी करुण नायरची भारताच्या अंतिम संघात खेळण्याची पुसटशी देखील शक्यता नव्हती. मात्र उपकर्णधार अजिंक्य रहाणेला दुखापत झाल्याने नायरला संधी मिळाली. मालिकेत यापूर्वी खेळलेल्या सामन्यात त्याने उत्तम फलंदाजी केलेली होती, मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश येत होते. या सर्व परिस्थितीत मालिकेतील शेवटचा कसोटी सामना जणू करुणसाठीच लिहला गेला होता.
भारतावर होता दबाव
सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडने मोईन अलीच्या शानदार 146 धावांच्या खेळीमुळे 477 धावांचा डोंगर उभा केला होता. इतक्या मोठ्या धावसंख्येच्या प्रतिउत्तरात भारतीय संघाने देखील उत्तम सलामी केली. पार्थिव पटेल आणि केएल राहुलने शतकी भागीदारी केली. यानंतर मात्र मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व विराट कोहली झटपट बाद झाल्याने भारतीय संघावर दबाव जाणवत होता. अशा परिस्थितीत करुण फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
सर्वांगसुंदर खेळी
करुणने सुरुवातीला काहीशी सावध भूमिका घेत आक्रमक फटके मारले नाहीत. मात्र मैदानात स्थिरावल्यानंतर त्याने आपला खेळ बदलला. त्याने आपले पहिले शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 185 चेंडू घेतले. यानंतर मात्र करुणने मैदानावर पूर्णतः आक्रमकता दाखवत पुढील शंभर धावा 121 चेंडूत पूर्ण केल्या. भारताला आपला डाव घोषित करायचा असल्याने करुण त्रिशतक झळकवतो अथवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. द्विशतकानंतर मात्र करुणने मैदानावर अक्षरशः रौद्र रूप धारण करत शेवटच्या शंभर धावा केवळ 75 चेंडूत पूर्ण करत आपले त्रिशतक साजरे केले. त्याने 381 चेंडूत 32 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 303 धावांची नाबाद खेळी केली.
विशेष म्हणजे तेव्हा करुणचे वय अवघे 25 वर्ष होते. तो कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक कमी वयात त्रिशतक करणारा खेळाडू देखील ठरला होता. करुणच्या या खेळीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याचे कौतुक केले होते.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या करुणला मात्र पुढील काळात उत्तम कामगिरी करता आली नाही. तसेच त्याला जास्त संधी देखील मिळाल्या नाहीत. आतापर्यंत करुणने केवळ सहा कसोटी सामने खेळलेले असून सध्या त्याचा भारतीय संघात समावेश देखील नाही.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र करुण सातत्याने धावांचा डोंगर रचत आहे. करुण मागील बऱ्याच वर्षांपासून कर्नाटक संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना आशा असेल की तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! बडोद्याचा पराभव करत तामिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
पंतप्रधानांचे ट्विट रिट्विट करून फसला विराट, चाहत्यांनी धरले धारेवर
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय