इंडियन प्रीमियर लीग ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे जगभरातील मोठमोठ्या क्रिकेट संघातील अनुभवी आणि युवा खेळाडू खेळताना दिसतात. याबरोबर आयपीएलमधून खेळाडूंना मिळणारा चिक्कार पैसा, प्रसिद्धी अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळावी. त्यातही युवा खेळाडूंना संधी मिळाल्यास आपल्या प्रतिभेने ते सर्वांची मने जिंकताना दिसतात. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील युवा खेळाडू रवि बिश्नोईही आयपीएलच्या तेराव्या हंगामात चमकदार कामगिरी करत आहे.
आयपीएल पदार्पणाच्या सामन्यातच केला पराक्रम
२० वर्षीय बिश्नोईला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. पण त्याने हार न मानता जिद्दीने आपले लक्ष्य गाठण्यासाठी मेहनत केली आणि अखेर आयपीएल २०२०च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतले.
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२०मध्ये बिश्नोईने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून संघाला आणि चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या हंगामातील दूसऱ्याच सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात खास कारनामा केला. आपल्या पहिल्याच सामन्यात फिरकीपटू बिश्नोईने दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ २२ धावा देत हा कारनामा केला.
स्वत: तयार केली होती खेळपट्टी
बिश्नोईने एकेकाळी स्वत:ची क्रिकेट अकादमी बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्याने प्रशिक्षक प्रघोत सिंग, शाहरुख पठान आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने अकादमी सुरुदेखील केली. पण त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, त्यामुळे बिश्नोईने स्वत: खेळपट्टी तयार करण्यासाठी रोलर चालवला.
वडिलांनी सांगितले होते क्रिकेटचा त्याग करायला
बिश्नोईला लहान असतानापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. तो सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत असायचा. पण पुढे त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यावरुन त्याने फिरकी गोलंदाजी करायला सुरुवात केली. १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी तो जीवाचे रान करुन मेहनत करत असायचा. परंतु त्याला पावला-पावलावर अपयश येत होते. हे पाहून काळजीपोटी त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट सोडण्यास सांगितले. पण त्याच्या प्रशिक्षकांनी त्याच्या वडिलांची समजूत काढली आणि बिश्नोईकडून अजून जास्त मेहनत करुन घेतली.
शेन वॉर्न आहे आदर्श खेळाडू
अखेर २०१९ साली बिश्नोईची १९ वर्षांखालील भारतीय विश्वचषक २०२० मध्ये निवड झाली. त्यावेळी संधीचे सोने करत त्याने पूर्ण टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक २२ विकेट्स चटकावल्या आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपल्या फिरकी गोलंदाजीने कहर करणाऱ्या बिश्नोईचा आदर्श क्रिकेटपटू शेन वॉर्न हा आहे. तसेच त्याने राशिद खान आणि युझवेद्र चहलला पाहून गोलंदाजीचे धडे गिरवले आहेत.
बिश्नोईची देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील आकडेवारी
बिश्नोईने देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये बिश्नोईने ६ सामने खेळत ६ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याने ६ सामन्यात ८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.