इंग्लंड क्रिकेटला खूप मोठा असा इतिहास आहे. इंग्लंडनेच जगाला क्रिकेट दिले. जेथे इंग्रज गेले तेथे क्रिकेट पोहोचले. नंतरच्या काळात प्रत्येक देशात क्रिकेटचे सुपरस्टार जन्माला येत राहिले. इंग्लंडच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सर जॅक हॉब्स, फ्रेड ट्रूमन, क्लॅरी ग्रिमेट, लेन हटन, जेफ्री बॉयकॉट, इयान बोथम, ग्रॅहम गूच यापासून ते केविन पीटरसन, अँड्र्यू फ्लिंटॉफ, अँड्र्यू स्ट्राॅस, ग्रॅम स्वान या खेळाडूंनी अफाट लोकप्रियता मिळवली. सध्या, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, इयान मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर हे खेळाडू जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी आहेत.
क्रिकेटमध्ये अनेकदा काही असे खेळाडू असतात, जे आपल्या देशासाठी भरपूर योगदान देतात मात्र त्यांना म्हणावा तितका सन्मान कधी कधी दिला जात नाही. प्रत्येक देशात असे चार-पाच क्रिकेटपटू मिळतातच. त्यापैकीच एक म्हणजे इंग्लंडचा माजी कसोटीपटू मार्क बुचर. काल याच इंग्लंडच्या ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ खेळाडूचा ४९ वा वाढदिवस होता.
मार्कचा जन्म ब्रिटिश पिता ऍलन व जमैकन आई इलेन यांच्या पोटी झाला. त्यामुळे, मार्कमध्ये क्रिकेटपटू व गायक असे दोन्ही गुण अनुवंशिकतेने आले. त्याचे पिता ऍलन हे इंग्लंडसाठी एक कसोटी आणि एक वनडे सामना खेळले होते. त्याचे काका मार्टिन व दोन्ही मोठे भाऊ इयान व गॅरी हेदेखील प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे, मार्कच्या घरात क्रिकेटला पूरक असे वातावरण आधीपासूनच होते.
१९९२ ला वयाच्या विसाव्या वर्षी सरे काऊंटी क्लबने मार्कला करारबद्ध केले. अगदी पहिल्या सामन्यापासून तो सरेचा महत्त्वपूर्ण खेळाडू बनला. तीन हंगामात सरेसाठी सर्वाधिक धावा बनवून मार्कने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला. १९९७ च्या ऍशेससाठी त्याची इंग्लंड संघात निवड झाली. पहिल्याच मालिकेत त्याने दोन अर्धशतके झळकावली. वेस्ट इंडिज दौरा खराब गेल्यानंतर मात्र, पुढच्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन अर्धशतके व एक शतक झळकावत संघातील आपली जागा मजबूत केली. दिवसेंदिवस चांगला खेळ दाखवत त्याने इंग्लंड कसोटी संघाच्या उपकर्णधार पदापर्यंत मजल मारली. १९९९ ला नासिर हुसेन अचानक दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एका कसोटीसाठी मार्कला कर्णधारपद देखील देण्यात आले. यानंतर मात्र, सलग १२ सामन्यात अर्धशतक देखील त्याला करता आले नाही. याचा परिणाम म्हणून, त्याला २००० मध्ये संघातून डच्चू देण्यात आला.
पुन्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याला जास्त धावा जमवता आल्या नाहीत. तो मानसिकरीत्या खचला होता. अशावेळी त्याचे वडील ऍलन व भाऊ गॅरी यांनी त्याला नव्याने प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. खेळासोबतच त्याची मानसिक स्थिती देखील पूर्ववत झाली. सरेने त्याच्यावर विश्वास दाखवत पुन्हा त्याला संघात सामील करून घेतले. सरेसाठी धावा काढल्याने, २००१ च्या घरच्या मैदानांवर होणाऱ्या ऍशेससाठी त्याची इंग्लंड संघात निवड झाली.
त्या ऍशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवणे अत्यावश्यक होते. हेडिंग्ले येथे होणाऱ्या त्या सामन्यात पराभव झाला असता तर, इंग्लंडला ऍशेस गमवावी लागली असती. ऑस्ट्रेलियाने रिकी पॉंटिंग व डॅमियन मार्टिनच्या शतकांच्या जोरावर धावफलकावर भल्यामोठ्या ४४७ धावा लावल्या. इंग्लड आपल्या पहिल्या डावात ३०९ करू शकला. पुन्हा एकदा रिकी पॉंटिंगच्या वेगवान ७२ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने १७६ धावांवर आपला डाव घोषित करत इंग्लंडसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष ठेवले.
मार्क्स स्ट्रेस्कॉथिक व माइक आथर्टन ही सलामीवीर जोडी वैयक्तिक १० व ८ धावा करून तंबूत परतली. यानंतर बुचर व कर्णधार नासिर हुसेन यांनी डाव सावरला. मॅग्रा, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी व शेन वॉर्न या दिग्गजांच्या समोर दोघांनीही संयम आणि आक्रमणाचा मिलाफ साधून १८१ धावांची बहुमूल्य भागीदारी केली. नासिर ५५ धावा काढून बाद झाला. बुचरने मार्क रामप्रकाशला सोबत घेत इंग्लंडला एक अविश्वसनीय कसोटी विजय मिळवून दिला. बुचरने २२७ चेंडूत १७३ धावांची अप्रतिम खेळी साकारली. ऍशेसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक खेळी असे विस्डेनने या खेळीसाठी म्हटले आहे.
२००१ च्या ऍशेसनंतरही बुचरचा फॉर्म तसाच राहिला. त्याने त्यानंतर बऱ्याच मॅचविनिंग खेळी केल्या. २००३ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो संघाच्या आत-बाहेर होऊ लागला. अखेरीस, डिसेंबर २००४ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध त्याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. २००९ पर्यंत तो सरेसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत राहिला. २००९ मध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
मार्कने १९९७-२००४ या काळात इंग्लंडसाठी ७१ कसोटी खेळताना ३४.५८ च्या सरासरीने ४,२८८ धावा फटकावल्या. सरेसाठी तब्बल १७ वर्ष प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत त्याने १८ हजार धावांचा रतीब घातला.
इंग्लंडकडून ७१ कसोटी खेळल्यानंतरही त्याला कधीच वनडे संघात स्थान मिळालेले नाही. इंग्लंडचा माजी खेळाडू ऍलेक स्टीवर्ट हा बुचरच्या बायकोचा भाऊ लागतो. अनेक क्रिकेट दिग्गज असे म्हणत की, बुचर हा इंग्लंडचा कर्णधार हवा होता. कारण, त्याच्यामध्ये नेतृत्वगुण उपजत होते.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने काही काळ समालोचक म्हणून काम केले. २०१० मध्ये त्याला एमसीसीचे आजीवन सदस्यत्व मिळाले. मार्कने स्वतःच्या नावाने एक म्युझिक बँड सुरू केला आहे. त्याच्या बँडला पूर्ण युरोपमधून चांगली मागणी आहे. एरिक क्लॅपटन सारखा कलाकार मार्कची वारंवार स्तुती करत असतो.