ऑस्ट्रेलियाने १९९९ ते २००९ या काळात जागतिक क्रिकेटवर एकछत्री राज्य केले. सुरुवातीला स्टीव वॉ आणि नंतर रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विक्रमांचे अनेक झेंडे गाडले. सलग तीन विश्वचषक आणि कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान ऑस्ट्रेलिया काबीज करून होता. त्यात, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदे देखील सामील होती.
मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, सायमन कॅटिच या वरच्या फळीतील फलंदाजांसोबत रिकी पॉंटिंग, डॅमियन मार्टिन, ॲडम गिलख्रिस्ट आणि अँड्र्यू सायमंड्स यांसारखे विध्वंसक फलंदाज व दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न तसेच ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी यासारखे एकाहून एक सरस वेगवान गोलंदाज त्या ऑस्ट्रेलिया संघात होते. या सर्वांसोबतच दशकाच्या मध्यात एक खेळाडू संघात सामील झाला. आपल्या अप्रतिम फलंदाजी व फिरकी गोलंदाजीने एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याने पार पाडली. पुढे जाऊन तो, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झाला आणि ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून दिला. तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क. ‘पप’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या क्लार्कने आजच्याच दिवशी २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता.
२००० साली ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकादमीची शिष्यवृत्ती मिळवत क्लार्कने राष्ट्रीय संघाकडे आगेकूच करायला सुरुवात केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे नाव चांगलेच गाजत होते. क्लार्कची ख्याती ऐकून इंग्लिश क्लब रॅम्सबॉटमने २००२ साली त्याला करारबद्ध केले होते.
युवा मायकलचा समावेश २००४ मध्ये भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात केला गेला. बंगळुरू येथील पहिल्या कसोटीत त्याने हरभजन सिंग अनिल कुंबळे झहीर खान इरफान पठाण यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करत १५१ धावांची अविस्मरणीय खेळी केली. मालिकेतील चौथ्या कसोटीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या दुसऱ्या डावात अवघ्या ९ धावांत क्लार्कने ६ बळी टिपले. काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेल्या स्टीव्ह वॉच्या जागी त्याच प्रतिभेचा मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाला मिळाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच वर्षी त्याला २००५ सालचे प्रतिष्ठेचे “ऍलन बॉर्डर मेडल’ देऊन ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला.
२००५ मध्येच ज्यावेळी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यादरम्यान पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, त्यावेळी क्लार्क ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. २००७ सालचा क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाला जिंकवण्यात देखील क्लार्कचे मोलाचे योगदान होते. विश्वचषकातील १२ वा खेळाडू म्हणून आयसीसीने त्याची निवड केली होती.
ॲडम गिलख्रिस्ट निवृत्त झाल्यानंतर, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा नवीन उपकर्णधार म्हणून क्लार्कची नियुक्ती करण्यात आली. २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा नियमित टी२० कर्णधार देखील तो बनला. २०१० च्या टी२० विश्वचषकात अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर, क्लार्कने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
भारतीय उपखंडात झालेल्या २०११ क्रिकेट विश्वचषकानंतर रिकी पॉंटिंगने कर्णधार पदाचा राजीनामा दिला व त्याचा उत्तराधिकारी मायकल क्लार्क बनला. कर्णधारपद मिळाल्यानंतर क्लार्कच्या कारकिर्दीने वेग धरला. २०१३ हे वर्ष त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट राहिले. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१३ सालच्या ऍशेसमध्ये इंग्लंडला ५-० असा व्हाईटवॉश दिला. त्याचवर्षी, आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, सर्वोत्कृष्ट कसोटीपटू व विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर हे तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार त्याने आपल्या नावे केले.
२०१५ चा मायदेशात झालेला विश्वचषक त्याने ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी करत त्याने ७२ चेंडूत ७४ धावा केल्या. तो बाद होऊन परतत असताना, मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवरील ९३ हजार प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे अभिनंदन करत होते.
वनडे कारकीर्दीची यशस्वी अखेर झाल्यानंतर त्या वर्षीची ऍशेस त्याच्यासाठी अखेरची ठरली. इंग्लंडमध्ये झालेली ही मालिका इंग्लंडने ३-२ अशा फरकाने खिशात घातली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या मालिकेत, कार्डिफ कसोटी जिंकत इंग्लंडने दमदार सुरुवात केली. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत ४०५ धावांनी मोठा विजय साकारला. बर्मिंघम व नॉटिंघम कसोट्या जिंकून इंग्लंडने ऍशेस आपल्याकडे राखली.
क्लार्कला ऍशेस विजयाची भेट ऑस्ट्रेलिया संघ देऊ शकला नाही. मात्र, मालिकेतील अखेरची ओव्हल कसोटी चौथ्या दिवशीच जिंकत क्लार्कला विजयी निरोप दिला. २३ ऑगस्ट २००५ या दिवशी, मायकल क्लार्कच्या ११ वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता झाली.