बीसीसीआय हे क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. संपूर्ण जगात भारताची क्रिकेट प्रणाली सर्वात सुदृढ मानले जाते. भारतातील घरगुती आणि युवा खेळाडूंसाठी ज्या योजना आणि कार्यक्रम बीसीसीआय आखत असते, त्या प्रकारचे कार्यक्रम इतर कोणत्याच देशात पाहायला मिळत नाही.
रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर चषक, विजय हजारे चषक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी, सी के नायडू ट्रॉफी या अशा अनेक स्पर्धा भारतात दरवर्षी आयोजित केल्या जातात. 19 वर्षाखालील युवांसाठी आणि महिला क्रिकेटपटूंसाठी सुद्धा काही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भरवत असते.
यामधील बहुतांशी स्पर्धा या माजी भारतीय खेळाडूंच्या स्मरणार्थ भरवल्या जातात. महाराणा रणजीत सिंग, दुलीप सिंग, विजय हजारे यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या भारतीय क्रिकेट मधील योगदानाबद्दल, त्यांचा गौरव म्हणून बीसीसीआय या स्पर्धा आयोजित करते.
या सर्वांमध्ये एक नाव दिसते ते म्हणजे एनकेपी साळवे. क्रिकेट रसिकांना एनकेपी साळवे असे कोण खेळाडू होते हे माहीत नाही. खरंतर एनकेपी साळवे हे खेळाडू नव्हतेच. ते बीसीसीआयचे माजी अध्यक्ष होते, आणि म्हणून त्यांचे नाव चॅलेंजर्स ट्रॉफी या स्पर्धेला देण्यात आले.
साळवे यांचा जन्म मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे झाला. त्यांचे नाव नरेन्द्र कुमार साळवे असे होते. महाविद्यालयीन जीवनात ते हौशी क्रिकेटपटू होते. आधी चार्टर्ड अकाऊंटट आणि नंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली.
आपले चार्टर्ड अकाऊंटट व वकिली ही कामे करत असताना नागपूरमध्ये क्रिकेटसुद्धा खेळत. क्रिकेट खेळण्यास सोबत ते स्थानिक सामन्यात पंच म्हणून देखील कामगिरी करत. एकंदरीत क्रिकेटची आवड असल्याने क्रिकेटसंबंधीची सर्व कामे इमानदारीने करत.
नंतरच्या काळात त्यांचा संबंध राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी आला. पुढे काँग्रेस पक्षासाठी नेता व वकील अशी दुहेरी भूमिका बजावत. क्रिकेट आणि राजकारणाचा जवळचा संबंध अगदी पहिल्यापासूनच आहे. साळवे याला अपवाद राहिले नाहीत.
एनकेपी साळवे हे हौशी क्रिकेटपटू आणि राजकारणी हे दोन्ही असल्याने विदर्भ क्रिकेट संघटनेत सामील झाले. दोन वर्ष संघटनेचे सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर १९७२ मध्ये त्यांची विदर्भ क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९७२ ते १९८० अशी सलग आठ वर्ष ते या पदावर राहिले.
१९८२ मध्ये तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष प्रणव मुखर्जी यांनी हे पद सोडताना पुढील अध्यक्ष म्हणून साळवे यांचे नाव सुचवले. १९८२ ते १९८५ या कार्यकाळात साळवे यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. या तीन वर्षाच्या काळात भारताने १९८३ क्रिकेट विश्वचषक आणि वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप १९८५ या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या नावे केल्या. १९८३ मध्येच त्यांचे आशिया क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदावर बहुमताने निवड झाली. भारतीय क्रिकेटचा चढता आलेख पाहता, एनकेपी साळवे यांनी पुढील विश्वचषक भारतात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. जगमोहन दालमिया यांच्यासोबत मिळून, अखेरीस त्यांनी विश्वचषक स्पर्धेत यजमानपद भारत आणि पाकिस्तानकडे खेचून आणले.
१९६७ ते १९७७ या दहा वर्षाच्या काळात ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरही १९७८-२००२ या २४ वर्षात ते सलगपणे राज्यसभेचे खासदार होते. यादरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला गेला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी व पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात देखील त्यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी माहिती व प्रसारण, पोलाद व खाण, संसदीय कार्य तसेच ऊर्जामंत्री ही कॅबिनेट मंत्री पदे भूषवली. नवव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी कारभार पाहिला.
एनकेपी साळवे यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाच्या स्मरणार्थ १९९४-१९९५ या मोसमापासून एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. एकदिवसीय प्रकारच्या या स्पर्धेत देशातील सर्वोत्कृष्ट असे ३६ खेळाडू निवडून त्यांचे तीन संघ बनत. त्यामध्ये भारत वरिष्ठ, भारत अ व भारत ब असे नामकरण संघांचे केले गेले. २००६-२००७ पासून त्या संघांची ओळख इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन अशी झाली. २०१४-१५ चॅलेंजर ट्रॉफीचे नाव बदलून तिला, चॅलेंजर सिरीज तर एकोणीस वर्षाखालील युवा खेळाडूंसाठी चॅलेंजर ट्रॉफी अशी नवीन स्पर्धा सुरू करण्यात आली.
राजकारणातून व क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर साळवे यांनी आपले सहकारी व माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांच्यासोबत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी २००३ मध्ये विदर्भ राज्य निर्माण काँग्रेस या पक्षाची स्थापना केली.
२०१२ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. साळवे यांचे सुपुत्र हरीश साळवे हे भारतातील सर्वात निष्णात आणि वरिष्ठ वकील म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९९-२००२ या काळात भारताचे सॉलिसिटर जनरल हे पद भूषवले. सध्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण प्रकरणात ते भारत सरकारची बाजू मांडत असतात.
वाचा- युवराजपेक्षा सरस असलेला महाराष्ट्राचा अभिजीत काळे भारतासाठी खेळला फक्त एक सामना