क्रिकेट, ग्लॅमर, पैसा, बाजार… ही सर्व कॉकटेल कुठून आली आहेत? आपण या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करीत असाल तर, 51 वर्षांपूर्वीची म्हणजेच ‘1 जानेवारी 1971’ ही तारीख अगोदर लक्षात घ्यावी लागेल. मग नक्की या दिवशी असे काय घडले ज्यामुळे भद्राजनांचा क्रिकेट हा खेळ कायमचाच बदलला?
कसोटी दरम्यान वनडे सामना कसा सुरू झाला?
सन 1970 च्या नोव्हेंबर महिन्यात अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला होता. त्या दिवसांत अॅशेस मालिकेत 6 कसोटी सामने खेळले जायचे. पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला गेला, जो ड्रॉ वर संपला. दुसरा कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला आणि तोही ड्रॉ वर संपला. आता मेलबर्नमध्ये खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्याची वेळ होती. हा कसोटी सामना 29 डिसेंबर 1970 पासून सुरू होणार होता. पण मुसळधार पावसामुळे पहिल्या तीन दिवसांचा खेळ झालाच नाही. यानंतर पंच आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी ही कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण त्या दिवसांत क्रिकेट सामन्यांचा विमा करण्याचे चलन नव्हते.
हा कसोटी सामना रद्द झाल्यास आयोजकांना सुमारे 80 हजार पौंड इतका तोटा सहन करावा लागला असता. मेलबर्न कसोटीसाठी प्रेक्षकांना विकलेली तिकिटे परत करावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने एकत्रितपणे निर्णय घेतला की मालिका संपल्यानंतर सातवा कसोटी सामनादेखील व्हावा. परंतु या अतिरिक्त कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचे खेळाडू अतिरिक्त पैशांची मागणी करू लागले. वास्तविक तो काळ प्रायोजक, करार आणि क्रिकेटमध्ये जास्त पैसे मिळतील असा नव्हता. त्या दिवसांमध्ये खेळाडूंना दिवसाच्या सामन्यानुसार वेतन मिळत असे.
यानंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मेलबर्नमधील स्थानिकांचे मनोरंजन व दोन्ही संघातील खेळाडूंच्या आर्थिक नफ्याला ध्यानात घेऊन दोन्ही संघांमध्ये 40-40 षटकांचा (8 चेंडूत 1 बळी) वनडे सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
परंतु या सामन्यासाठी प्रायोजक शोधणे देखील एक कठीण काम होते. मोठ्या अडचणीने तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती करणार्या राॅथमँस कंपनीने या सामन्याला प्रायोजित करण्यास सहमती दर्शविली. तेही केवळ 5 हजार पौंडसाठी. ज्यामध्ये सामनावीर पुरस्कार विजेत्यासाठी 90 पौंड ठेवले होते. कंपनीचे या सामन्यासाठी 20 हजार तिकिटांची विक्री करण्याचे उद्दीष्ट ठेवले, जेणेकरून पैसे काढता येतील.
सामन्यात काय घडले?
5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. इंग्लंड -11 आणि ऑस्ट्रेलिया -11 असे दोन संघ मैदानात उतरले. सामन्यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बिल लॉरीने टाॅस जिंकला आणि इंग्लंडचा कर्णधार रे इलिंगवर्थला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. 39.4 षटकांत 190 धावा करुन संपूर्ण इंग्लंड संघ बाद झाला. मिडल ऑर्डरमधील फलंदाज जॉन अॅन्ड्रिचने सर्वाधिक 82 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या समोर सामना जिंकण्यासाठी आता 40 षटकांत (म्हणजे 320 चेंडूत) 191 धावा करण्याचे लक्ष्य होते. इयान चॅपेलच्या 60 धावांच्या मदतीने 5 विकेट गमावून त्याने हे लक्ष्य सहज साधले.
इंग्लंडच्या जॉन अॅन्ड्रिचला सामनावीर म्हणून घोषित केले गेले आणि 90 पाउंडच्या रकमेसह वनडे ‘सामनावीर’ बनलेला तो पहिला क्रिकेटपटू ठरला.
सामन्यानंतर सर डॉन ब्रॅडमन यांनी मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना संबोधित केले आणि म्हणाले,
“आज आपण इतिहास बनवताना पाहिला आहे.”
आणि वनडे क्रिकेटने खरोखरच इतिहासावर न मिटणारी छाप सोडली.
पहिल्या सामन्यात पडला पैशांचा पाऊस…
प्रायोजक कंपनी राॅथमँसला 20 हजार प्रेक्षकांची अपेक्षा होती, तर 46 हजाराहून अधिक लोक हा सामना पाहण्यासाठी आले होते. यासह, कंपनीने केवळ त्यांचे पैसे वसूल केले नाही तर मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळवला.
या सामन्याच्या यशाकडे पाहता आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याची मान्यता दिली. येथूनच अधिकृतपणे वनडे क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
अँडरसन-ब्रॉडच्या कारकिर्दीला लागला पूर्णविराम? आगामी मालिकेसाठी दाखवला संघातून बाहेरचा रस्ता
”यावेळी प्लेसिसमागे सर्व संघ धावणार”; भारताच्या प्रमुख खेळाडूची भविष्यवाणी
तो परत आला! तब्बल ९ वर्षांनंतर श्रीसंत उतरणार रणजीच्या रणांगणात