मुंबई क्रिकेट हे किती समृद्ध आहे हे फक्त भारतच नाही तर, संबंध क्रिकेट विश्वाला माहित आहे. विजय मर्चंट, विजय हजारे, पॉली उम्रीगर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे ते आता पृथ्वी शॉ व यशस्वी जयस्वाल या सर्व खेळाडूंनी मुंबई क्रिकेट ‘जगात भारी’ असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केलय. या सर्व मोठ्या नावांमध्ये काही अशीही नावे आहेत जी, थोड्या काळासाठी का होईना पण भारतीय संघासाठी खेळली. याचपैकी एक नाव म्हणजे प्रवीण आमरे.
क्रिकेटचे द्रोणाचार्य समजले जाणारे रमाकांत आचरेकर, यांच्याच हाताखाली तयार झालेला हा खेळाडू. चंद्रकांत पंडित, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रमेश पोवार, अजित आगरकर यांच्याप्रमाणे प्रवीण देखील भारतासाठी खेळणारा आचरेकर सरांचा सहावा शिष्य.
१४ ऑगस्ट १९६८ मध्ये मुंबईत त्याचा जन्म झाला. लहानपणी इतर मुंबईकरांप्रमाणेच तो देखील, मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या ‘ शिवाजी पार्क ‘ वर खेळायला जात असे. दोन वर्ष तो फक्त क्षेत्ररक्षणच करत होता. इतर मोठी मुले त्याला कधीतरी फलंदाजी देत. अशातच, आचरेकर सरांसारख्या जोहरीने त्याची पारख केली. पहिल्याच दिवशी आचरेकरांना त्याच्यातील कौशल्या दिसली. आचरेकरांनी त्याला शारदाश्रम शाळेत दाखल व्हायला सांगितले. शारदाश्रममध्ये दाखल झाल्यावर आचरेकरांची करडी शिस्त व प्रवीणची मेहनत या द्विसूत्रीने प्रवीण दिवसेंदिवस उत्तम होऊ लागला.
प्रवीणला राष्ट्रीय स्तरावर खरी ओळख मिळाली ती १९८३ च्या १५ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेतून. पहिल्याच सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना त्याने ११५ धावा बनवल्या होत्या. दोन आठवड्यांनी, पश्चिम विभागासाठी खेळताना ५४ धावांची मॅचविनिंग खेळी त्याने खेळली होती. १९८६ ला एकोणीस वर्षाखालील पश्चिम विभागीय संघात त्याची निवड झाली. तत्पूर्वी, मुंबई संघाकडून खेळताना त्याने २५४ धावांची मॅरेथॉन खेळी उभारली होती.
१९८६ ला त्याने मुंबईसाठी रणजी पदार्पण केले. मात्र, अवघा एक सामना खेळल्यानंतर त्याला रेल्वे संघाकडून नोकरीची ऑफर देण्यात आली. आचरेकर सरांशी सल्लामसलत करून त्याने तो प्रस्ताव स्वीकारला. रणजीतील अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला मध्य विभागाचा कर्णधार देखील करण्यात आले. याच काळात, प्रवीणचा ज्युनियर असलेला सचिन भारतासाठी खेळू लागला होता. प्रवीणने देखील हिम्मत हरली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्याने धावा काढणे त्याने सुरूच ठेवले.
अखेरीस, प्रवीणचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आला. पण, अंतिम अकरामध्ये संधी मिळत नव्हती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ८८ ची सरासरी असलेल्या खेळाडूला मुख्य संघात स्थानच मिळत नव्हते. १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकत्ता वनडेमध्ये त्याने भारताचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले. त्या सामन्यात ७४ चेंडूत ५५ धावांची लाजवाब खेळी करत भारताला विजयी केले.
एकदिवसीय पदार्पण करून वर्ष होत असताना, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच नोव्हेंबर १९९२ ला डर्बन कसोटीत त्याने पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाची टोपी डोक्यावर चढवली. प्रवीण कल्याण आमरे भारताचा १९५ वा कसोटी खेळाडू झाला होता.
द. आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसल्सने शतक झळकावत आपल्या संघाला २५४ पर्यंत मजल मारून दिली. भारताचा डाव सुरू झाला आणि ॲलन डोनाल्ड, ब्रेट शूट, मॅकमिलन व प्रिंगल ह्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर धावा बोलला. भारताची अवस्था ४ बाद ३८ अशी दयनीय झाली होती. कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन खेळपट्टीवर उभा होता.
अझरुद्दीनच्या साथीला पदार्पण करणारा प्रवीण आला. द. आफ्रिकेच्या वेगवान चौकडीने २४ वर्षीय प्रवीणला बाउन्सर व इनस्विंगने बेजार केले मात्र तो अडून राहिला. दुपारच्या सत्रानंतर, अझरुद्दीन दुर्दैवीरित्या धावबाद झाला व कपील देव सुद्धा दोन चेंडूपेक्षा जास्त काळ टिकू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा, भारताची धावसंख्या १२८-६ अशी होती. प्रवीण आमरे ३९ धावांवर नाबाद होता.
तिसऱ्या दिवशी, डोनाल्डने संघर्ष करत असलेल्या मनोज प्रभाकरला लवकर बाद केले. दुसऱ्या बाजूने मॅकमिलन निर्धाव षटके टाकत होता. किरण मोरे व प्रवीण आमरे या दोघांनाही धावा काढणे कठीण जात होते. इतक्यात, ब्रेट शूट दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे इतर गोलंदाज दमू लागले. दमलेले गोलंदाज पाहून प्रवीणने थोडी जोखीम घेत फटके खेळायला सुरुवात केली.
अखेरीस, ९८ धावांवर असताना फिरकीपटू ओमर हेन्रीला डोक्यावरून चौकार मारत त्याने पदार्पणात शतक झळकावणारा नववा भारतीय होण्याचा मान मिळवला. परदेशात पदार्पण करताना शतक करणारा तो केवळ तिसरा भारतीय होता. शतकानंतर तो लवकर बाद झाला. तो सामना नाट्यमयरित्या अनिर्णित राहिला पण सामन्याचा मानकरी प्रवीण आमरे होता. त्या सामन्याचे सामनाधिकारी क्लाइव्ह लॉईड यांनी प्रवीणचे कौतुक करताना म्हटले होते की,
” सुनील गावसकर व गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या शैलीचा हा खेळाडू आहे. ”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटची इतक्या दिमाखदारपणे सुरुवात करणाऱ्या प्रवीणला त्यानंतर मात्र देशासाठी फक्त ११ कसोटी सामने खेळायला मिळाले. द. आफ्रिकेतून परतल्यानंतर, सात सामन्यात संघाच्या रणनीतीनुसार वेगवान धावा काढण्याच्या नादात तो अनेकदा लवकर बाद झाला. मात्र अशावेळीही, २५६ धावा काढताना त्याची सरासरी ५१.२० इतकी जबरदस्त होते.
प्रवीणची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द उण्यापुऱ्या नऊ महिन्यांची राहिली. ११ सामन्यात ४२५ धावा बनवताना त्याची सरासरी ४२.५० इतकी होती. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं गेले तर प्रवीण आमरेला अपयशी होण्याची संधी देण्यात आली नाही. त्याआधीच त्याची कारकीर्द संपली अथवा संपवली गेली होती.
https://www.instagram.com/p/ChOnmNUJUBd/?utm_source=ig_web_copy_link
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर प्रवीण आमरे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक नावाजलेला क्रिकेट प्रशिक्षक झाला. २०१२ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो प्रशिक्षक होता. आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया, मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स या संघांसाठी त्याने प्रशिक्षकाची भूमिका निभावली.
भारतीय क्रिकेटमध्ये रहस्यमयीरित्या अकाली कारकीर्द संपलेल्या क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेल्या या अस्सल मुंबईकरास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाजाचा ‘द हंड्रेड’मध्ये कहर, सलग ४ चेंडूंवर ठोकले षटकार
Best Catch | ‘या’ खेळाडूने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, पाहा व्हिडिओ
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला