---Advertisement---

काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका

On: गुरूवार, ऑगस्ट 18, 2022 8:20 AM
---Advertisement---

८० च्या‌ दशकात भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलेले. १९८३ सालचा विश्वचषक भारताने जिंकला. १९८५ ला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली. १९८७ ला पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर भारतीय उपखंडात क्रिकेटचे यशस्वी आयोजन देखील करून दाखवले. त्यावेळी कर्णधार असलेले कपिल देव, सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांसारख्या खेळाडू सोबतच एका खेळाडूने देखील सर्वांची वाहवा मिळवली होती. आपली स्टाईल व खेळाच्या आक्रमक अंदाजाने तो चाहत्यांत चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्या खेळाडूचे नाव संदीप मधुसूदन पाटील. आज त्याच संदीप पाटील यांचा वाढदिवस. १८ ऑगस्ट १९५६ रोजी जन्मलेले संदीप पाटील आज ६६ वर्षांचे होत आहेत.

संदीप यांचे आई-वडील मधुसूदन व सुमित्रा हे दोघेही बॅडमिंटन मिश्र दुहेरीचे चांगले खेळाडू होते. मुंबईच्या अनेक स्थानिक स्पर्धा त्यांनी आपल्या नावे केल्या होत्या. संदीप व त्यांची बहीण आशा हेदेखील लहानपणापासून बॅडमिंटन खेळत. बॅडमिंटन सोबतच संदीप यांचे वडील मुंबईसाठी रणजी सुद्धा खेळत.

संदीप यांच्या वडिलांनी संदीप यांना क्रिकेट खेळण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी, त्यावेळचे मुंबई मधील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक अण्णा वैद्य यांच्याकडे ते संदीप यांना पाठवत. संदीप यांचे तंत्र मजबूत व्हावे म्हणून अण्णा त्यांच्या पायाला दोरी बांधत. प्रत्यक्षात संदीप यांना वेगवान गोलंदाजांना सामोरे जाण्याची भीती वाटायची. त्यामुळे ते, चेंडू लागायचे भीतीने बाजूला होत. शेवटी, प्रशिक्षक अण्णांनी, संदीप यांच्या पायाला दोरीने बांधायला सुरुवात केली. त्यामुळे, संदीप यांना चेंडू खेळणे भाग पडत.

संदीप यांनी १९७६ मध्ये हैदराबाद विरुद्ध रणजी पदार्पण केले. फलंदाज म्हणून खेळत असलेले संदीप त्यावेळी गोलंदाजीत चमकले होते. त्यांचे पहिले दोन बळी होते आबिद अली व एल एम जयसिम्हा. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिमाखदार कामगिरी करत १९८० साली भारताकडून त्यांनी पदार्पण केले.

संदीप पाटील हे अत्यंत मस्तमौला खेळाडू होते. १९८२ चा इंग्लंड दौऱ्यावर, त्यांनी एकदा सर्व भारतीय खेळाडूं विरुद्ध प्रॅन्क केला होता.
लॉर्ड्सवरील कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगून ठेवले होते की, काही लोक येतील आणि म्हणतील की आम्ही भारतीय क्रिकेटपटू आहोत, तर त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका. कारण, पाटील यांना माहीत होते या सर्व खेळाडूंची ओळखपत्रे ही रूममध्ये आहे. लॉर्ड्सच्या कर्मचाऱ्यांनी देखील सर्व खेळाडूंना बराच वेळ अडवून ठेवले. शेवटी, पाटील यांनी प्रॅन्क असल्याचे सांगितल्यानंतर भारतीय खेळाडूंना सोडण्यात आले. त्याच दौऱ्यावर, तमाम इंग्लिश क्रिकेट चाहते पाटील यांच्या आक्रमक खेळावर फिदा झाले होते.

संदीप पाटील हे स्थानिक आणि घरगुती क्रिकेटमध्ये चतुर कर्णधार म्हणून प्रसिद्ध होते. सुनील गावस्कर यांनी त्यांना निरालोन आणि सनग्रेस मफतलाल या संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती.

१९८३ ला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते महत्त्वपूर्ण सदस्य होते. उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध यशपाल शर्मा यांच्यासमवेत संदीप यांनीदेखील आक्रमक अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी, संदीप पाटील यांनी अवघ्या ३२ चेंडू ते अर्धशतक पूर्ण केले होते.

एकदा त्यांनी षटकार मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल देव यांच्यावर टीका केली होती. जेव्हा ते भारताकडून खेळत असतानाही त्यांनी कर्णधारावर टीका करण्याचे धाडस दाखवले होते.

पाटील यांनी आपल्या सहा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत, २९ कसोटी सामन्यात ३६.९३ च्या सरासरीने १,५८८ धावा काढल्या. वनडेमध्ये ४५ सामन्यात १,००५ धावा आपल्या नावे केल्या. यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश होता.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते, मात्र, त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. १९९६ मध्ये श्रीलंकेतील चौरंगी मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाकडून वाईटरित्या पराभूत झाला, त्यानंतर प्रशिक्षक संदीप पाटील यांनी खेळाडूंची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यावरून, खेळाडू व पाटील यांच्यात बाचाबाची झाली. नंतर, कर्णधार आणि खेळाडूंनी संदीप पाटील यांच्याबद्दल मंडळाकडे तक्रार केली आणि यामुळे संदीप पाटील यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले.

२००२ मध्ये केनिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. भल्याभल्या संघांना मात देत केनियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. यामध्ये, पाटील यांचे मोलाचे योगदान होते.

केनियाच्या प्रशिक्षक पदावरून बाजूला झाल्यावर बीसीसीआयच्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी त्यांची निवड झाली. २०१२ ते २०१६ यादरम्यान, संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले.

हेही वाचा-

आजच्याच दिवशी १४ वर्षांपूर्वी सुरू झाला होता विराट कोहलीचा ‘क्रिकेट अध्याय’; वाचा त्याच्या प्रवासाबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---