काही दिवसांपूर्वी काही न्यूज पेपर्समध्ये छोट्या जागेत तर, काही न्यूज पेपर्समध्ये मध्यम जागेत एक बातमी दिसत होती. बातमी होती अविनाश साबळे याने स्टीपलचेस या ॲथलेटिक्स प्रकारातील आपलाच नॅशनल रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडला. नॅशनल रेकॉर्ड सातत्याने मोडत असतात, नवे बनत असतात. मात्र, एकच खेळाडू वारंवार ही कामगिरी करत असेल तर, तो नक्कीच स्पेशल असणार हे नक्की. त्यातही साबळे हे अस्सल मराठमोळं आडनाव म्हटल्यानंतर, थोडं कुतूहल वाढायला हवंच. टोकियो ऑलिम्पिकनंतर ज्या खेळाडूने सातत्याने चांगली कामगिरी करत, आपली दखल घ्यायला भाग पाडले, अशा भारतीय ॲथलेटिक्समधील नव्या सिताऱ्याचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारा हा लेख…
अविनाश मुकुंद साबळे. गाव मांडवा. हे मांडवा अग्निपथमधील विजय चौहानचे नव्हे बरं… मांडवा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. हा त्याचा पूर्ण पत्ता. मराठवाड्यातील या अत्यंत दुष्काळी गावातून अविनाश साबळेचा प्रवास सुरु होतो. वडील अल्पभूधारक शेतकरी. त्यातही ती जमीन कोरडवाहू असल्याने ते वीटभट्टीवर काम करायचे. आईदेखील अशीच मजुरीचे काम करायची. वीटभट्टीवर कामगार असल्याने मुकुंद साबळे यांचे कुटुंब तिथेच राहायचे. अविनाश मोठा झाला नि त्याला शाळेत घातले गेले. त्याचं घर आणि शाळा यांच्यात ६ किलोमीटरचे अंतर. येण्या-जाण्याच्या प्रवासाची काहीही सोय नाही. खाचखळग्यांचा आणि काट्यांचा रस्ता तुडवत अविनाश शाळेपर्यंत पोहोचायचा. अविनाश रोजच असे लांबचे अंतर, सहाव्या वर्षापासून पार करून येत असलेले पाहून, त्याच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी त्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला. अविनाश जीव तोडून पळाला आणि बक्षीस घेऊन आला. तिथून पुढे तो प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायचा आणि जिंकायचा. ते म्हणतात ना ‘विनिंग हॅबिट’, ती अविनाशला लागली होती. २००६ मध्ये सर्वात पहिल्यांदा गावकऱ्यांनी त्याचं सत्कार करत कौतुक केलं. तेव्हा त्याचं वय जेमतेम बारा वर्ष होतं. मात्र कौतुकाची ही शेवटची संधी नसेल, हे त्याने मनाशी पक्क बांधलं आणि आणखीन स्पर्धा गाजवायला सुरुवात केली.
हेही पाहा- अनेकांना माहिती पण नाय अशा खेळात महाराष्ट्राचा पठ्ठ्या वर्ल्ड रेकॉर्ड करतोय
शालेय शिक्षण घेत असतानाच, त्याने रनिंगवरील आपले लक्ष हटू दिले नाही. तो सातत्याने सराव अशात, बारावी उत्तीर्ण होताच इंडियन आर्मीत तो भारती झाला. खरंतर त्याच्या दैदीप्यमान यशाची इथेच सुरुवात झाली. त्याची सुरुवातीची पोस्टिंग सियाचिन ग्लेशियर, त्यानंतर राजस्थानातील वाळवंट आणि शेवटी सिक्कीम अशा वेगवेगळ्या प्रदेशात होत राहिली. २०१५ च्या इंटर आर्मी क्रॉस कंट्री स्पर्धेत त्याने भाग घेतला. त्यावेळी अविनाशला माहिती समजली की, आर्मीमध्ये प्रमोशन मिळवायचे असेल तर, एखाद्या खेळात विशेष प्रावीण्य मिळवायला लागत. त्याला सहकार्याने स्टीपलचेस निवडण्याचा सल्ला दिला. स्वतः अविनाशला, ॲथलेटिक्समधील एक प्रकार यापलीकडे स्टीपलचेसबद्दल फारसे माहीत नव्हते. तो स्टीपलचेस खेळाडूंचा सराव पाहता-पाहता, धावू लागला. त्यावेळी आर्मीचे कोच असलेल्या अमरीश कुमार यांची त्याच्यावर नजर पडली, आणि त्यांनी अविनाशला स्टीपलचेसमध्ये करिअर करण्याविषयी विचार कर म्हणून सांगितले. त्याने होकार दिला, ट्रेनिंग सुरू केले, आणि त्यानंतर एक इतिहास लिहायला सुरुवात झाली.
पुढची गोष्ट जाणून घेण्यापूर्वी नक्की हे स्टीपलचेस असते काय हे थोडक्यात जाणून घेऊ. तर स्टीपलचेस म्हणजे अडथळ्यांच्या शर्यतीचं थोडं वेगळं रूप. ३००० मीटरची ही ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील रेस एकूण ३५ अडथळ्यांची असते. त्यापैकी २८ हाय हर्डल आणि ७ वॉटर हर्डल. त्यात स्टीपलचेस हा ऑलम्पिक गेम असल्याने त्याला थोडा अधिक मान मिळतो हेही खरे.
फक्त प्रमोशनच्या आशेने स्टीपलचेस सुरु केलेल्या अविनाशला लवकरच या खेळाची गोडी लागली. जसजसा परफॉर्मन्स चांगला होऊ लागला, तसतसा त्याचा कॉन्फिडन्स वाढला. मिल्खा सिंग यांना जसा वर्ल्डरेकॉर्ड तोडायचा होता तसा, अविनाशला पहिल्यांदा स्टीपलचेसमधील नॅशनल रेकॉर्ड खुणावत होता. अशात २०१८ एशियन गेम्सपूर्वी त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. ते म्हणतात ना, सेटबॅकपेक्षा कमबॅक जबरदस्त हवा. अगदी तेच अविनाशने करून दाखवलं. त्याच वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या नॅशनल्समध्ये ८ मिनिटे २९.८० सेकंद अशी अशी वेळ नोंदवत, गोपाल सैनी यांचा ३७ वर्षा जुना नॅशनल रेकॉर्ड मोडीत काढला. इथपासूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या नावाची दखल घेतली जाऊ लागली.
सन २०१९ मध्ये दोहा आशियाई ॲथलेटिक्समध्ये सिल्व्हर मेडल मिळवायची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली. वर्ल्ड ऍथलेटिक्सची फायनल खेळला. तिथंच त्याला टोकियो ऑलिम्पिकच तिकीट मिळाल. ऑलम्पिकमध्ये त्याच दुर्दैव आड आल.. अवघ्या एका स्थानामुळे त्याची फायनल खेळण्याची संधी हुकली. मात्र, आपल्या हिटमध्ये त्याने पुन्हा एकदा नवा नॅशनल रेकॉर्ड स्थापित केला होता. ऑलिम्पिकमधील त्याला थोडक्यात आलेल्या अपयशानंतर, क्रीडा मंत्रालयाने त्याचा टॉप्समध्ये समावेश केला. अविनाशकडे ऑलिम्पिक मेडल होप म्हणून पाहिला जाऊ लागलंय.
इतकच काय, स्टीपलचेस सोडून अविनाशने मागील महिन्यात अमेरिकेच्या सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये ५००० मीटर शर्यत १३ मिनिटे २५.६५ सेकंद वेळेत पूर्ण करून त्याने बहादुर प्रसाद यांचा ३० वर्षे जुना विक्रम मोडला.
आता ॲथलेटिक्समधील वर्ल्डकप म्हटल्या जाणाऱ्या, डायमंड लीगमध्ये पाचव्या स्थानी राहूनही तब्बल नवव्यांदा स्वतःचाच स्टिपलचेसमधील नॅशनल रेकॉर्ड अविनाशने मोडलाय. हा नवा रेकॉर्ड आता ८ मिनिटे १२.४८ सेकंद झालायं. पुढे येणाऱ्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये अविनाश खेळेल यात काही शंकाच नाही. पण, नीरज चोप्राने ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक मेडलची सुरू केलेली परंपरा अविनाशने पुढे न्यावी अशीच सर्वांची इच्छा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?
प्रतिभा असूनही मुंबई इंडियन्सने सलग दोन वर्षे अर्जुनला फक्त बेंच गरम करत का ठेवलंय?
भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर