भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने काहीदिवसांपूर्वीच श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यात काही युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. त्यात वरुण चक्रवर्ती, या ‘मिस्ट्री स्पिनर’चाही समावेश होता. आज (२९ ऑगस्ट) त्याचाच ३० वा वाढदिवस आहे.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची कहाणी एखाद्या चित्रपटासारखीच आहे. वरुणला लहाणपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. १७ वर्षांच्या वयात दुखापती आणि संधी न मिळाल्यामुळे तो आपल्या शाळेकडे वळला होता. त्याने एका सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे आपले शालेय शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. परंतु तिथेही मन न रमल्यामुळे तो पुन्हा क्रिकेटकडे वळला.
चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे घेतले शिक्षण
वरुण चक्रवर्तीने केवळ १७ वर्षांच्या वयात दोन वेळा दुखापतींमुळे क्रिकेट खेळणे सोडले होते. बारावी पास केल्यानंतर त्याने ५ वर्षे चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने नोकरीही केली. परंतु, तिथे त्याचे मन लागले नाही. यानंतर त्याने वयाच्या २६ व्या वर्षी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले. क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला, “क्रिकेट माझ्या आयुष्यात पुन्हा परतेल याचा मी विचार केला नव्हता. परंतु मी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.”
तसेच ज्यावेळी त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हाही त्याने भावूक ट्विट केले होते. त्याने म्हटले होते की ‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारतीय संघाची जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास खास होता. काही चढ आणि अनेक उतार होते, पण गंतव्यापेक्षा प्रवास जास्त सुंदर आहे. निकालांकडे दुर्लक्ष करुन पुढे जात राहिल. सर्वांचे धन्यवाद. प्रवास पुढेही चालू राहिल.’
Its been some journey from wearing a formal shirt (Architect) to donning the INDIAN jersey..with little highs & many lows, but the journey has been very beautiful than the destination, will keep marching ahead irrespective of the results.Thank you all. The journey goes on.😊🙏🏽 pic.twitter.com/G2E4LTzUmC
— Varun Chakaravarthy🇮🇳 (@chakaravarthy29) July 26, 2021
करोडो रुपयांमध्ये झाला संघात सामील
नोकरी सोडून वरुण पुन्हा मैदानावर परतला. त्याने तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये केवळ ९ सामने खेळत २२ विकेट्स घेतल्या. यानंतर त्याला २०१९ मध्ये आयपीएल फ्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते. त्यानंतर २०२० आयपीएलसाठी झालेल्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले आहे.
सात प्रकारे गोलंदाजी
क्रिकेटचे तज्ज्ञ वरुणला एक उत्तम फिरकीपटू म्हणतात. वरुणचा असा दावा आहे की तो सात प्रकारे गोलंदाजी करू शकतो. ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, यॉर्कर या सात प्रकारे गोलंदाजी करू शकतो.
धोनीची घेतली विकेट
वरुणने कोलकातासाठी आयपीएल हंगामात सातत्याने चांगली कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीलाही त्रिफळाचीत केले होते. धोनीची विकेट घेतल्यानंतर त्याने म्हटले होते की, हा त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण क्षण होता. सामन्यानंतर त्याने धोनीसोबत फोटोही घेतला होता. सोबतच धोनीने त्याला शाबासकीदेखील दिली होती. वरुणने आयपीएलमध्ये २१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेटमधील कामगिरी
वरुणने आतापर्यंत क्रिकेटमध्ये १ प्रथम श्रेणी सामना, ९ अ दर्जाचे सामने आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ विकेट घेतली आहे. यासोबतच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १६.६८ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२० मध्ये त्याने २४.८५ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून त्याला २ विकेट्स घेण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीसाठी ‘हा’ खेळाडू करू शकतो टीम इंडियात पुनरागमन, कोहलीचे संघबदलाचे संकेत
तब्बल ‘एवढ्या’ कोटी रुपयांचे नुकसान पत्करून रोनाल्डो खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
‘तू महान खेळाडू झालास’, ज्याचा विक्रम मागे टाकला त्यानेच रुटचा लहानपणीचा फोटो केला शेअर