इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका बुधवारपासून(८ जूलै) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना साऊथँप्टन येथे सुरु आहे. मात्र या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आलेली नाही. याबद्दल त्याला त्रास झाल्याचे आणि तो संतप्त झाल्याचे त्याने सांगितले आहे.
याबरोबरच ब्रॉडने त्याला संधी न देण्याचा निर्णय समजण्यास कठिण असल्याचे म्हटले असून इंग्लंडचे राष्ट्रीय निवडकर्ते एड स्मिथ यांच्याकडून भविष्याबद्दल त्याने स्पष्टीकरण मागितले आहे.
पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी स्काय स्पोर्ट्सशी बोलताना ब्रॉड म्हणाला, ‘मी विशेषतः भावनिक व्यक्ती नाही परंतु शेवटचे दोन दिवस मला खूप कठीण वाटले. मी निराश झालो असे म्हणणे म्हणजे कमी लेखण्यासारखे असेल. आपला फोन पडल्यावर स्क्रीन फुटते तेव्हा आपण निराश होतो.’
‘पण मी वैतागलो, चिडलोय. हे समजणे कठिण आहे. मला वाटते मी गेल्या काही वर्षांत मी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, त्यामुळे मला वाटते मला संधी मिळायला हवी होती. मी ऍशेससाठी संघात होतो आणि मी दक्षिण आफ्रिकेलाही गेला आणि जिंकलो.’
ब्रॉडने इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत सर्वाधिक १४ विकेट्स घेतले होते. तसेच त्याने २०१९ च्या ऍशेस मालिकेत २३ विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडकडून ४८५ कसोटी विकेट्स घेणारा ब्रॉड पुढे म्हणाला, ‘मी काल रात्री एड स्मिथशी बोललो, ते मला म्हणाले, १३ जणांचा संघ निवडण्यात त्यांचाही सहभाग होता आणि हा संघ पूर्णपणे खेळपट्टीला अनुरुप निवडण्यात आला आहे.’
ब्रॉड पुढे म्हणाला, ‘मला माझ्या भविष्याबद्दल स्पष्टीकरण हवे आहे. मला माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.’
‘त्यामुळे हो मी वैतागलो होतो कारण मला वाटते मी संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र होतो,’ असेही ब्रॉड म्हणाला.
असे असले तरी ब्रॉडने त्याच्याऐवजी निवड झालेल्या गोलंदाजांचे कौतुकही केले आहे. त्याने असेही म्हटले आहे की ते सुद्धा संघात जागा मिळवण्यासाठी पात्र आहेत आणि सध्या या जागेसाठी असलेली स्पर्धा इंग्लंड क्रिकेटसाठी चांगली आहे. फक्त तो त्याला संधी न मिळाल्याने निराश झाला होता.
इंग्लंडच्या संघात पहिल्या कसोटीसाठी मार्क वूड, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन या वेगवान गोलंदाजांची निवड झाली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!
रिटायरमेंटवर धोनीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा; सांगितलं, काय अपेक्षित आहे धोनीला