ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा ऍशेस सामना होबार्टमध्ये खेळला जात आहे. ऍशेस मालिकेतील (ashes series 2021-22) शेवटच्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत दिसत आहे. असे असले तरी, इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (stuart broad) याने या सामन्यात इतिहास घडवला आहे. ब्रॉड ऍशेसच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम यांचा विक्रम मोडला आहे.
होबार्ट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रॉडने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली आणि ऍशेस मालिकेतील आतापर्यंत इंग्लंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा खेळाडू ठरला. सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नर अवघ्या तीन चेंडूत तंबूत परतला. डावाच्या पहिल्याच षटकात ब्रॉडने वॉर्नरला शून्य धावांवर बाद केले.
३५ वर्षीय अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडेने या सामन्याच्या दुसऱ्या डावात वॉर्नरची विकेट घेऊन ऍशेस मालिकेतील त्याच्या १२९ विकेट्स पूर्ण केल्या. त्याने या विकेट्स ऍशेसच्या ३५ कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत. वॉर्नरच्या विकेटनंतर ब्रॉडने इंग्लंडचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू बॉथम यांचा विक्रम मोडला आहे. बॉथम यांनी यापूर्वी इंग्लंडसाठी सर्वाधिक १२८ ऍशेस विकेट्स घेतल्या होत्या. आता ब्रॉड या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
इंग्लंड संघासाठी ऍशेस मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये दिग्गज जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. अँडरसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत आतापर्यंत ११२ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बॉब विलीस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी ऍशेसमध्ये एकूण १२३ विकेट्स घेतल्या आहेत.
एकंदरित विचार केला, तर ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न ऍशेसमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. शेन वॉर्नने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ऍशेस सामन्यांमध्ये एकूण १९५ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, सध्या खेळल्या जात असलेल्या ऍशेस २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून ३-० अशी आघाडी घेतली होती. मालिकेतील चौथा कसोटी सामना इंग्लंड संघाने कसाबसा अनिर्णीत केला आणि क्लीन स्वीप होण्यापासून स्वतःला वाचवले. आता शेवटच्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
अजब गजब! दोन वेगवेगळ्या देशात स्टेडियम असल्यामुळे रद्द करावा लागला सामना, कारणंही आहे तसंच
बदल होणारच! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून होणार भारतीय क्रिकेटची ‘नवी सुरुवात’
आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान
व्हिडिओ पाहा –