वर्ष १९६१… इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला होता. उभय संघांत तीन कसोटी सामने खेळले गेलेले, तर दोन सामने खेळले शिल्लक होते. तिसर्या आणि चौथ्या कसोटी दरम्यान १२ दिवसांचा अवधी होता. कारण, ही मालिका ख्रिसमस दरम्यान खेळली जात होती आणि इंग्लंडचा संघ ख्रिसमस साजरा करण्यासाठी इंग्लंडला परतलेला. ख्रिसमसनंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात चौथी कसोटी ३० डिसेंबर पासून खेळली जाणार होती.
सुभाष गुप्ते आणि कृपाल सिंह यांना केले होते संघाबाहेर
चौथी कसोटी सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कृपाल सिंग आणि सुभाष गुप्ते यांना भारतीय संघातून बाहेर करण्यात आले. त्यांच्या जागी इरापल्ली प्रसन्ना यांना संधी दिली गेली. ही बातमी वार्यासारखी पसरली. लोकांना मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांनाही दुखापत झाली नव्हती. संपूर्ण मालिकेत गुप्ते चांगली गोलंदाजी करत होते आणि कोलकात्याच्या खेळपट्टीवर गुप्ते यांची लेग स्पिन गोलंदाजी प्रभावशाली ठरली असती. सर्व परिस्थिती गुप्ते यांच्या बाजूने असताना, त्यांना संघाबाहेर का केले गेले हा प्रश्न अनुत्तरित होता.
शिस्तभंग केल्याने झाली होती कारवाई
भारतीय संघाचे नेतृत्त्व त्यावेळी नरी कॉन्ट्रॅक्टर करत होते. त्यांच्याकडे वारंवार विचारणा केली असता समजले की, कृपाल सिंग आणि सुभाष गुप्ते यांना शिस्तभंगाच्या कारणास्तव बाहेर करण्यात आले आहे. या घटनेची लवकरच सुनावणी होणार आहे. त्यानंतर, थोड्याच वेळाने संपूर्ण प्रकरण समोर आले. सुभाष गुप्ते आणि कृपाल सिंग भारतीय संघासोबत असताना, एकाच खोलीत राहत होते. त्या खोलीतून कोणीतरी कॉल करत, रिसेप्शनिस्टला विचारले होते की, ‘तुम्ही माझ्यासोबत ड्रिंक घेणार का?’,
तेव्हा रिसेप्शनिस्ट व हॉटेलचा व्यवस्थापक यांनी भारतीय टीम मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली होती आणि त्यावर कारवाई म्हणून संघ व्यवस्थापनाने कृपाल सिंग आणि सुभाष गुप्ते यांना संघातून बाहेर केले होते.
कृपाल सिंग यांनी स्वीकारला होता आरोप
खरंतर, सुभाष गुप्ते यांना जेव्हा तुम्हाला संघातून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले, तेव्हा खरे प्रकरण काय आहे हे माहीत नव्हते. सुभाष गुप्ते यांना त्यांचे मुंबईचे सहकारी पॉली उम्रीगर भेटले आणि त्यांनी तुला कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर शोधत असल्याचे सांगितले. कॉन्ट्रॅक्टर यांनी गुप्ते यांना काय झाले आहे ते सांगितले. कृपाल सिंग यांना हा विषय आधीच सांगितला गेला होता. त्यामुळे, कृपाल सिंग घरी जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झाले होते. सुभाष गुप्ते घाईघाईने विमानतळावर जाऊन त्यांना भेटले. कृपाल सिंग यांनी गुप्ते यांना आश्वस्त केले की, तुमची यात काहीही चूक नाही.
विमानतळावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मुथय्या चिदंबरम उपस्थित होते. गुप्ते यांनी तातडीने त्यांची भेट घेतली. गुप्ते यांनी चिदंबरम यांना विचारले की, “आरोपी गुन्हा कबूल करण्यास तयार आहे तर मला का या प्रकरणात ओढताय?” तेव्हा चिदंबरम यांनी आपण फोनवर बोलू, असे म्हणत चर्चा टाळली.
गुप्ते यांना तो फोन कधीच आला नाही
गुप्ते यांना चिदंबरम यांचा तो फोन कधी आलाच नाही. प्रकरणाची चौकशी सुरू झाली नाही. गुप्ते असे सांगण्यात आले होते की, संघ कोलकत्याला पोहचल्यावर या प्रकरणाची सुनावणी होईल. त्याच वेळी सुभाष गुप्ते व कृपाल सिंग यांना आपण कुठेही प्रवास करू नये, अशीही स्पष्ट सूचना दिली गेली होती. त्यामुळे ते दिल्लीहून कोलकात्याला पोहोचू शकले नाहीत. गुप्ते मुंबईत घरी राहून सुनावणीविषयी पत्राची वाट पाहत होते. तिकडे उर्वरित दोन सामने खेळून मालिका देखील संपली. सुभाष गुप्ते यांना भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यांना या प्रकरणात स्वतःची बाजू सांगण्याची ही संधी दिली गेली नव्हती.
राजकारण करत केले बाहेर
इंग्लंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर पुढच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती. मद्रासमध्ये संपूर्ण निवड समिती, कर्णधार चर्चा करत होते. गुप्ते यांच्याकडे आपण या प्रकरणात सामील नव्हतो, हे सांगण्याविषयी कोणताही पुरावा नव्हता. क्रिकेट बोर्डाच्या एका सदस्याने तरीही गुप्ते यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, तू या घटनेत सामील नव्हता तर तू कृपाल सिंग यांना थांबवले का नाही? त्यावेळी गुप्ते यांनी उत्तर दिले होते की, मी त्यांच्यापेक्षा लहान होतो. ते कितीतरी अधिक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू आहेत. यानंतरही गुप्ते यांना संघात स्थान देण्यात आले नाही. नंतर अशा बातम्या आल्या की, बोर्डातील काही सदस्यांनी आधीच ठरवले होते गुप्ते व कृपाल सिंग यांना वेस्ट इंडिज दौऱ्यावर न्यायचेच नाही.
भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूला सोडावा लागला होता भारत
आपल्या दहा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३६ कसोटी सामने खेळताना १४९ बळी मिळवणाऱ्या गुप्ते यांना कदाचित यावेळी समजले नव्हते की, त्यांनी भारतासाठी आपली अखेरची कसोटी खेळली आहे. मुंबईसाठी एक हंगाम प्रथमश्रेणी क्रिकेट खेळून ते त्रिनिदाद आणि टोबॅगोला आपल्या पत्नीकडे गेले. त्यांची पत्नी पोर्ट ऑफ स्पेन येथे राहत. गुप्ते अधीमधी भारतात येत. मात्र, दोन तीन वर्षानंतर त्यांनी भारतात येणे देखील बंद केले. आता पोर्ट ऑफ स्पेन त्यांचा कायमचा पत्ता बनला होता. ज्याच्या फिरकीवर सारं जग फिदा होतं त्या खेळाडूच्या नशिबी अखेरच्य क्षणी देखील भारतभूमी नव्हती. २००२ मध्ये गुप्ते यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे अखेरचा श्वास घेतला.
संपूर्ण कारकिर्दीत भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या गुप्ते यांचे क्रिकेट एका फोन कॉलमुळे संपुष्टात आले. आरोपीने गुन्हा कबूल करूनही, गुप्ते यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता अत्यंत कूटनीतीने त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीची समाप्ती करण्यात आली. भारतीय क्रिकेटमधील राजकारणाचा पहिला बळी ठरण्याचे दुर्भाग्य देखील गुप्ते यांच्या वाट्याला आले.
वाचा- ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
ब्रॅडमन यांचा ‘तो’ विक्रम आपल्या मराठमोळ्या भाऊसाहेब निंबाळकरांनी तेव्हाच मोडला असता, पण…