मुंबई। इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत सोमवारी 4 जूनला भारताने केनियाला 3-0 ने पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने 2 गोल करून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
हा सामना छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 वा सामना होता. भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया नंतर छेत्री हा १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसराच भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे.
या सामन्याआधी छेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना बघण्याचे आवाहन केले होते. चाहत्यांनाही त्याला नाराज न करता स्टेडियममधे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत चांगला प्रतिसाद दिला.
हा प्रतिसाद पाहून कर्णधार छेत्रीने ट्विट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जर तुम्ही प्रत्येकवेळी आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत असताना असाच पाठिंबा दिला तर आम्ही वाचन देतो आम्ही खेळताना आमचे सर्वस्व पणाला लावू. ही रात्र विशेष होती कारण आपण सगळे यात एकत्र होतो. स्टँड्समधून आणि घरून पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार”
We promise you that if that’s the kind of support we get every time we play for the country, we will give our lives on the pitch. India, this night was special because we were in this together. Those in the stands shouting, and the ones at home cheering – thank you!
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 4, 2018
या सामन्यासाठी भारताचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया आणि माजी फुटबॉलपटू आयएम विजयनही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छेत्रीचा 100 व्या आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल सन्मान करण्यात आला.
याबरोबरच छेत्रीच्या 100 व्या सामन्यासाठी त्याचे कुटुंबही स्टेडीयममध्ये उपस्थित होते.
भारताचा या स्पर्धेतील पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध ७ जूनला होणार आहे. या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारताने १ जूनला झालेल्या सलामीच्या सामन्यात चायनीज तिपेईला 5-0 असे पराभूत केले होते.