भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (20 डिसेंबर) शनिवारी पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. खेळाडूंची घोषणा झाल्यानंतर, भारताचा दुहेरी स्वरूपाचा कर्णधार शुभमन गिल संघातून वगळला गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. गिल तिन्ही स्वरूपांमध्ये संघाचा नियमित सदस्य होता, परंतु टी-20 विश्वचषकापूर्वी त्याला टी20 संघातून वगळण्यात आले. तथापि, त्याचा फॉर्मही खराब होता. गिलला वगळल्यानंतर, दिग्गज फलंदाज सुनील गावस्करने त्याला घरी जाऊन नजर उतरवून घ्या’ असा सल्ला दिला आहे.
अलीकडेच भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार बनलेला शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या मालिकेत त्याने अनुक्रमे 4, 0 आणि 28 धावा केल्या, तर दुखापतीमुळे पाचव्या सामन्यात तो खेळू शकला नाही.
जिओस्टारच्या कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “हे पूर्णपणे आश्चर्यकारक आहे. कारण शुभमन हा दर्जेदार खेळाडू आहे. उत्कृष्ट फलंदाज असून मागील हंगामात त्याची कामगिरी शानदार होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही सामन्यांत त्याला संघर्ष करावा लागला हे मान्य आहे, पण शेवटी क्लास म्हणजेच गुणवत्ता महत्त्वाची ठरते. फॉर्म येतो-जातो.”
गावस्कर पुढे म्हणाले, “शुभमनकडे टॅलेंटची अजिबात कमतरता नाही, पण मागील काही काळ त्याच्यासाठी कठीण गेला आहे. तो चांगली सुरुवात करत आहे, मात्र मोठी खेळी खेळू शकलेला नाही. त्याला झालेल्या दुखापतीही काहीशा विचित्र होत्या – आधी मान, मग गुडघा. त्यामुळे मी त्याला सांगितलं की घरी कुणाकडून तरी नजर उतरवून घ्या. कारण कधी कधी नजर लागते, असं आम्ही मानतो.”
दरम्यान, संघ जाहीर केल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “शुभमन गिल किती दर्जेदार खेळाडू आहे हे आम्हाला माहीत आहे. मात्र सध्या त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या.”
आगरकर पुढे म्हणाले, “मागील विश्वचषकातही वेगळ्या संयोजनामुळे तो संघाबाहेर राहिला होता. संघ निवडताना संयोजन खूप महत्त्वाचं असतं. 15 खेळाडूंचा संघ निवडताना कुणाला तरी बाहेर ठेवावंच लागतं आणि यावेळी दुर्दैवाने शुभमन गिलला वगळावं लागलं.”






