जेव्हा केव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक प्रश्न विचारला जातो की, कसोटी क्रिकेटमधील भारताचे दोन सर्वात्तम सलामीवीर कोण ? तेव्हा दोन परस्परविरोधी नावे समोर येतात. जवळपास प्रत्येक क्रिकेट चाहता हीच दोन नावे घेत असतो. ही दोन नावे म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील सार्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेले सुनील गावसकर आणि दुसरा म्हणजे २१ व्या शतकात भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात ज्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असा विरेंद्र सेहवाग. गावसकर हे कमालीचे संयमी आणि भक्कम बचाव असलेले तर, दुसरीकडे सेहवाग एकदम निर्धास्त आणि बेफिकीरपणे आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज. सेहवाग आपल्या कारकिर्दीत कधीही विकेट टिकवून आणि काळजी करून खेळला नाही. त्रिशतकी खेळी करण्यासाठीही त्याने षटकार मारला होता; इतका तो विस्फोटक. सेहवागला कधी बचावात्मक खेळताना कोणी पाहिले नसेल; मात्र, बचावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुनील गावसकरांना सेहवागसारखे, ताबडतोड खेळताना क्रिकेटचाहत्यांनी पाहिले आहे. याच सुनील गावसकरांच्या सर्वात वेगवान खेळीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
बदल्याची मालिका
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जून १९८३ मध्ये कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, आपला पहिलावहिला विश्वचषक उंचावला. भारतासारख्या त्यावेळी दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने, विश्वचषक जिंकणे ही क्रिकेटप्रेमींना अचंबित करणारी गोष्ट होती. भारताने विश्वचषक जिंकला यापेक्षा, भारताने अंतिम फेरीत दोन वेळच्या गतविजेत्या वेस्ट इंडीजला हरवून ही स्पर्धा जिंकली; याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ म्हणून ओळखला जायचा. भारताने वेस्ट इंडीजच्या विश्वविजयाची हॅट्रिक पूर्ण होऊ दिली नव्हती. भारताकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी वेस्ट इंडिज संघ शोधत होता. ही संधी त्यांना लवकरच मिळाली.
वेस्ट इंडीजची दमदार सुरुवात
विश्वचषकानंतर अवघ्या चार महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर आला. या दौऱ्यावर सहा सामन्यांच्या मोठ्या कसोटी मालिकेनंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार होती. वेस्ट इंडीज संघ दोन वेळचे विश्वविजेता कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांच्या नेतृत्वात खेळणार होता. भारताचे कर्णधारपद देखील कपिल देव यांच्या हाती होते. दौऱ्याची सुरुवात कानपूर कसोटीने झाली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने एक डाव आणि ८३ धावांनी भारताला धूळ चारली. वेस्ट इंडीज संघ विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी खूपच उत्साहित असल्याचे दिसून आले.
दिल्ली कसोटी आणि गावसकरांचा खराब फॉर्म
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला. मालिकेतील दुसरी कसोटी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणार होती. भारतीय कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. कोटलाची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन भासत होती. खेळपट्टी चांगली असली तरीही, वेस्ट इंडीजचे गोलंदाज साधेसुधे नव्हते. माइकल होल्डिंग व माल्कम मार्शल यांच्या जोडीला वेन डॅनियल तसेच विन्स्टन डेविस हे गोलंदाज होते. महान अॅण्डी रॉबर्ट्स हे दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांपासून दूर झालेले.
भारताकडून सलामीला अंशुमन गायकवाड व सुनील गावसकर ही जोडी मैदानात उतरली. या सामन्यात उतरण्यापूर्वी, सुनील गावस्कर यांचे मागील काही दौरे अतिशय खराब गेले होते. वेस्ट इंडिज दौऱ्यावर ते सपशेल अपयशी झालेले. भारताने जिंकलेल्या विश्वचषकातदेखील त्यांचे योगदान काही खास राहिले नव्हते. पाकिस्तान दौऱ्यात त्यांनी काही धावा बनविल्या; मात्र, पाकिस्तान संघातील एकाही गोलंदाजाच्या नावे १०० बळी नव्हते. गेली १३ वर्ष ते भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा वाहत होते. या महत्त्वाच्या मालिकेत त्यांच्याकडून भारतीय संघ आणि चाहत्यांनी मोठी अपेक्षा ठेवलेली.
गावसकरांचे धडाकेबाज अर्धशतक
भारताचा डाव सुरू झाला आणि अंशुमन गायकवाड वैयक्तिक ८ धावांवर होल्डिंग यांचे शिकार झाले. तिसऱ्या क्रमांकावर गावसकर यांच्या सोबतीला दुसरे मुंबईकर दिलीप वेंगसरकर उतरले. पहिला गडी लवकर बाद झाल्याने, भारतीय संघ सावध खेळेल असे वाटत असताना; गावसकरांनी स्वभावाच्या विपरीत आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात केली. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचे बाउन्सर हूक आणि पूल करत ते धावा जमवू लागले. खराब चेंडू लॉंग लेग आणि मिड विकेटला जाताना दिसत होते. कोटलातील प्रेक्षक एका अद्भुत खेळीचे साक्षीदार होत चाललेले. गावसकरांनी एकदम वनडे स्टाईल फटकेबाजी करत अवघ्या ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दुसरीकडे, वेंगसरकर अगदी आरामात कसलेही दडपण न घेता खेळत होते. उत्तम पदलालित्य दाखवत, एक बाजू त्यांनी लावून धरली होती. पुढ्यात पडलेल्या चेंडूंवर अप्रतिम ड्राईव्ह मारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. होल्डिंग यांना खेळताना, त्यांची शैली वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघ या दोन मुंबईकरांमुळे पहिल्यात सत्रात ‘फ्रंटफुट’ वर चाललेला.
… आणि गावसकरांनी गाठले ब्रॅडमन यांना
अर्धशतकानंतर गावसकर काहीसे, हळू खेळू लागले. मात्र, मैदानाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे फटके जात होते. शांत, संयमी आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गावसकरांचे हे आक्रमक रूप पाहून सर्वजण चकित होते. तीन तासाच्या फलंदाजीनंतर, भारताची धावसंख्या १६९-१ अशी असताना गावसकरांनी आपली तीन आकडी धावसंख्या गाठली. फिरकीपटू लॅरी गोम्स यांना षटकार मारत यांनी आपले शतक पूर्ण केले. हे शतक अवघ्या ९४ चेंडूत आले होते. याच शतकाबरोबर, सुनील गावसकर यांनी सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांची बरोबरी केली. मात्र, गावसकर त्यावेळी या विक्रमाबाबत अनभिज्ञ होते. मैदानात पाणी घेऊन आलेल्या बाराव्या खेळाडूने त्यांना ही कल्पना दिली.
सुनील गावसकर वैयक्तिक १२१ धावा काढून बाद झाले. वेंगसरकर यांनी दीडशतकी खेळी करत भारताची धावसंख्या ४६४ पर्यंत नेली. कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांच्या शतकाने वेस्ट इंडीजने देखील ३८४ धावांचे प्रत्युत्तर दिले. भारताने आपल्या दुसऱ्या डावात २३३ धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाने २ बाद १२० धावा करून सामना अनिर्णित राखला.
या मालिकेत वेस्ट इंडीजने भारतीय संघाचा ३-० ने पराभव करत मालिका जिंकली. मालिका वेस्ट इंडीजने जिंकली असली तरी, मालिकेचे मालिकावीर होते सुनील गावसकर. ५०० पेक्षा अधिक धावा काढत, त्यांनी मालिकेवर आपली मोहोर उठवली होती.