भारतीय संघ २०२०-२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. विराटची पत्नी अनुष्का ही आपल्या पहिल्या अपत्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जन्म देऊ शकते. त्यामुळे, तिच्यासोबत राहण्यासाठी विराट भारतात दाखल होईल. विराटच्या या निर्णयाचे माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी स्वागत केले आहे.
सुनील गावसकर तीन महिने आपल्या मुलाला पाहू शकले नव्हते
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. कपिल देव नुकतेच हिंदुस्तान टाइम्सने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
विराटच्या पालकत्व रजेविषयी विचारले असता ते म्हणाले, “सध्याची परिस्थिती पाहता, विराटचे जाणे-येणे भारतीय संघाला परवडणारे नाही. सुनील गावसकर हे जवळपास तीन महिने आपल्या मुलाला पाहू शकले नव्हते. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आताचा काळ खूप बदलला आहे. विराटबाबत बोलायचे झाल्यास, तो त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला होता. आता तो आपल्या मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेत आहे.”
कपिल यांनी केली दोन्ही काळाची तुलना
कपिल यांनी पूर्वीच्या आणि आताच्या काळाची तुलना करताना म्हटले, “आमच्या वेळच्या आणि आताच्या काळात खूप तफावत आहे. आत्ता खेळाडूंना ज्या सुविधा आहेत त्याविषयी आम्ही विचारही करू शकत नव्हतो. आता दोन-तीन दिवसात तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकता. मला आनंद आहे की, आता खेळाडू या स्तरावर पोहोचले आहेत. आपण विराटच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे”
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून होत आहे सुरुवात
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. दौऱ्यावर सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी येथे खेळले जातील. त्यानंतर, तिसरा वनडे आणि पहिला टी२० सामना कॅनबेरा येथे खेळवला जाईल. अखेरच्या दोन टी२० सामन्यांसाठी दोन्ही संघ पुन्हा सिडनी येथे दाखल होतील. अखेरीस, १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटविरुद्ध ‘हा’ खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शस्त्र
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात