वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी ॲडलेड कसोटीत 4-4 विकेट घेत भारताला सामन्यात परत आणलं. सिराजनं भारतासाठी धोकादायक ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
ट्रॅव्हिस हेड जोपर्यंत क्रीजवर होता, तोपर्यंत तो झटपट फटके खेळून धावा करत होता. सिराजनं त्याला एका यॉर्करवर क्लीन बोल्ड केलं. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. हेड हा ॲडलेडचा स्थानिक खेळाडू आहे. त्याच्यासोबत वाद घातल्यामुळे मैदानावरील चाहत्यांनी सिराजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी कॉमेंट्री करत असलेले दिग्गज सुनील गावस्कर देखील सिराजच्या आक्रमक सेलिब्रेशनवर नाराज दिसले. त्यांनी या वेगवान गोलंदाजाला चांगलंच फटकारलं.
ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजनं ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं, त्याची गरज नव्हती असं सुनील गावस्कर यांचं मत आहे. ट्रॅव्हिस हेडनं 141 चेंडूंचा सामना करत 140 धावा केल्या. तो आऊट झाल्यानंतर सिराज त्याला काहीतरी म्हणाला, ज्यावर हेडनंही प्रतिक्रिया दिली. मात्र ॲडलेडच्या स्थानिक चाहत्यांना हे आवडले नाही. यानंतर त्यांनी भारतीय गोलंदाजाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सुनील गावस्कर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाले, “जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन की याची गरज नव्हती. त्यानं (हेड) 140 धावा केल्या आहेत, 4-5 धावा नाहीत. तो 140 धावा करत आहे आणि तुम्ही त्याला विनाकारण हातवारे करत आहात. ट्रॅव्हिस हेड हा स्थानिक हिरो आहे. त्यानं 100 धावा केल्यानंतर सिराजनं टाळ्या वाजवल्या असत्या तर तो संपूर्ण प्रेक्षकांसाठी हिरो ठरला असता. परंतु तुम्ही खलनायक ठरला. त्यानं 140 धावा केल्या आहेत. जर तो एक-दोन धावांवर बाद झाला असता, तर तुम्ही त्याच्याशी वेगळ्या पद्धतीनं हातवारे केले असते.”
हेही वाचा –
रिषभ पंत कसोटीतही आयपीएल प्रमाणे फलंदाजी करतो! विचित्र शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावरही फ्लॉप! बोल्ड होण्याचा नवा विक्रम बनवला
भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत, दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप