29 मार्च रोजी झालेल्या केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील दीर्घकाळ चाललेलं वैर संपुष्टात आलं. सामन्यातील ब्रेक दरम्यान गंभीर आणि विराट एकमेकांना मिठी मारताना दिसले. इतकंच नाही तर दोघांमध्ये काहीसं संभाषण झालं, त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. या दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनी यावरून दोघांची चांगलीच फिरकी घेतली.
सामन्यादरम्यान गौतम गंभीरनं विराट कोहलीला मिठी मारली तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले रवी शास्त्री गंमतीनं म्हणाले, “विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मिठीसाठी केकेआरला ‘फेअर प्ले अवॉर्ड’ द्यायला हवा.” शास्त्रींच्या या टिप्पणीवर सुनील गावसकर यांनी एक मजेशीर प्रतिक्रिया दिली. “केवळ ‘फेअरप्ले अवॉर्ड’च नाही तर ‘ऑस्कर अवॉर्ड’ही दिला पाहिजे”, असं गावसकर म्हणाले.
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला होता. वास्तविक, विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. गौतम गंभीर त्यावेळी लखनऊचा मेंटॉर होता. सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात यावरून बराच गदारोळ झाला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की इतर खेळाडूंना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. याशिवाय आयपीएल 2013 मध्ये जेव्हा गौतम गंभीर केकेआरचा कर्णधार होता तेव्हाही त्याचं कोहलीसोबत वाजलं होतं.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीने दिलेले 183 धावांचं लक्ष्य केकेआरनं अवघ्या 16.5 षटकांत गाठलं. सुनील नरेननं फिल सॉल्टच्या साथीनं कोलकात्याला धमाकेदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी केवळ 6.3 षटकांत 86 धावा जोडल्या. नरेननं 22 चेंडूंचा सामना करत 47 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरनं 30 चेंडूत 50 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर 24 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोणतंही भांडण असेल तर…”, कोहली-गंभीर वादावर दिल्ली पोलिसांची पोस्ट व्हायरल
IPL 2024 मधील कामगिरीवरून आइसलँड क्रिकेटनं उडवली मिचेल स्टार्कची खिल्ली! सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”