काही दिवसांपूर्वीच यूएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडला. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच युवा फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.त्यापैकीच एक नाव म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल. आयपीएल २०२१ स्पर्धेत हर्षल पटेलने सर्वाधिक गडी बाद करत पर्पल कॅप पटकावण्याचा मान मिळवला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याची न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी हर्षल पटेलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षल पटेलने अप्रतिम गोलंदाजी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला जेतेपद मिळवता आले नाही. परंतु हर्षल पटेलच्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यात मदत झाली होती.त्याने या हंगामातील १५ सामन्यात ३२ गडी बाद केले होते. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला होता.
तसेच सुनील गावसकर यांनी हर्षल पटेलबाबत बोलताना म्हटले की, “त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पहिली तर तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी हकदार आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्या वयावर जाऊ नका कारण १५ दिवसांपूर्वी त्याने इतके गडी बाद केले आहेत तर या मालिकेत किंवा पुढच्या वर्षी तो त्याच कामगिरीची पुनरावृत्ती का करू शकत नाही? त्याने खरचं चांगली कामगिरी केली आहे ज्याचे फळ त्याला मिळाले आहे. तुम्ही वयाची चिंता नका करू तुम्ही जोपर्यंत चांगली कामगिरी कराल तुम्हाला भारताकडून खेळण्याची संधी मिळत राहील. निवड समितीने हे चांगले संकेत दिले आहेत.”
न्यूझीलंड संघाविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज






