भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी शुक्रवारी (१० जुलै) आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस लिटल मास्टर गावसकरांनी लहान मुलांसाठी समर्पित केला आहे. गावसकरांनी ३५ मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मागील वर्षीही ३४ मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली होती. मागील वर्षी नवी मुंबईतील श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअरच्या उद्घाटन समारंभादरम्यान गावसकरांनी हा संकल्प केला होता.
३५ शतके त्यामुळे ३५ मुलांची सर्जरी
ज्या आई- वडिलांना आपल्या मुलांचा उपचार करता येत नाही, त्या मुलांच्या मदतीसाठी गावसकर (Sunil Gavaskar) पुढाकार घेतात. ३५ मुलांना उपचारासाठी निवडण्यामागील कारण म्हणजे, त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केलेल्या शतकांची संख्या (३५ शतके) होय. श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअरमध्ये मुलांवर उपचार केला जाईल. गावसकर शेकडो मुलांना जीवदान देणाऱ्या ‘द हार्ट टू हार्ट’ फाऊंडेशनसाठीही काम करतात.
‘ओनली दिल, नो बिल’
श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हर्ट केअरचे खारघर, नवी मुंबई, रायपूर, पलवल आणि हरियाणामध्ये शाखा आहेत. त्यांचा केवळ एकच उद्देश्य आहे- ‘ओनली दिल, नो बिल.’
आपल्या या मोहिमेबद्दल सांगताना गावसकर म्हणतात, “मुलांना एक विशेष स्थान आहे. सर्व कुटुंब आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य आणि आनंदाची अपेक्षा करतात. दुर्दैवाने, भारतात जन्मापासूनच सर्वात सामान्य आजार म्हणजे हृदयविकार. अनेकांना सन्मानाने जगण्याची संधी नसते. आणि त्यापैकी बहुतेक गरीब आहेत. तसेच या देशातील सेवा मर्यादित आहे.”
५९ शतके त्यामुळे ५९ लाख रूपयांची मदत
जगभरात कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत अनेक दिग्गजांनी मदतीचा हात दिला आहे. अशामध्ये गावसकरांनीही ५९ लाख रूपयांचे योगदान दिले होते. खरंतर गावसकरांच्या नावावर एकूण ३५ (३४ कसोटी + १ वनडे) आंतरराष्ट्रीय शतके आहेत. त्यामुळे त्यांनी ३५ लाख रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये दिले होते. त्याचबरोबर मुंबई संघाकडून खेळताना २४ शतके केल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्यांनी २४ लाख रुपयांचे योगदान दिले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-या भारतीय क्रिकेटरचा मुलगा राहतो जंगलात; वाघांवर आहे विशेष प्रेम