नुकताच महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे पार पडला. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊल ठेवलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी पराभूत केले. तसेच 5 व्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला.
या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) आपले मत मांडले आहे.
महिला क्रिकेटमधील प्रतिभा शोधण्यासाठी महिला आयपीएल (Womens IPL) सुरु केले पाहिजे, असे गावस्कर यावेळी म्हणाले. तसेच विश्वचषकातील एकाही सामन्यात पराभूत न होता भारतीय महिलांनी (Indian Womens) अंतिम सामन्यात प्रवेश करणे, हे दर्शविते की गोष्टी योग्य मार्गाने जात आहेत, असेही गावस्कर यावेळी म्हणाले.
इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “मी सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि बीसीसीआयला (BCCI) सांगू इच्छितो की, पुढील वर्षापासून महिला आयपीएलदेखील सुरु केले पाहिजे. जेणेकरून महिला खेळाडूंमधील प्रतिभा समोर येतील. भारतात प्रतिभेची काहीच कमतरता नाही. तसेच भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर अजून महिला समोर येतील.”
“जर 8 संघ नसतील तरीही महिला आयपीएल होऊ शकते. त्यामुळे महिलांना संधी मिळेल,” असेही गावस्कर यावेळी म्हणाले.
“बीसीसीआय महिला क्रिकेटची व्यवस्थितपणे काळजी घेत आहे. त्यामुळेच महिला क्रिकेटने एवढी प्रगती केली आहे. विश्वचषक स्पर्धांच्या 1 महिन्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला होता. तसेच यजमान संघाविरुद्ध मालिकाही खेळला होता,” असे बीसीसीआयबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले.
यावेळी गावस्करांनी भारतीय महिला संघाची फलंदाज स्म्रीती मंधना (Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचे (Harmanpreet Kaur) उदाहरण दिले. स्म्रीती आणि हरमनप्रीत यांना बिग बॅश लीग खेळण्याचा भरपूर फायदा झाला.
“स्म्रीती आणि हरमनप्रीत यांनी महिला बिग बॅश लीग खेळली होती. ज्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. अगदी अशाच प्रकारचा फायदा आयपीएलमधून पुरुष क्रिकेटपटूंना झाला आहे,” असेही आयपीएलबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले.