आयपीएल २०२१ चा एलिमिनेटोरसाठीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकातानाने ४ विकेट्सने विजय मिळवर अंतिम सामन्याच्या आशा जिवंत ठेवल्या. कोलकाताच्या विजयात अष्टपैलू सुनील नरेनने मोलाचे योगदान दिले. त्याने गोलंदाजी करताना २१ धावात चार बळी मिळवले. तर फलंदाजीतही मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, त्याने गोलंदाजी करताना आरसीबीचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सलाही पॅव्हेलियनची वाट दाखवली.
सुनील नरेनने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले त्याने या सामन्यात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, श्रीकर भरत आणि डिव्हिलिअर्स यांना बाद केले. त्याने डिव्हिलिअर्सला आयपीएलमध्ये चौथ्यांदा बाद केले.
त्यामुळे आयपीएलमध्ये डिव्हिलिअर्सला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले. यापूर्वी डिव्हिलर्सला श्रेयस गोपाल, पियुष चावला, कृणाल पंड्या यांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी चार वेळेस बाद केले आहे.
कोलकाताचा विजय
एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. संघाच्या ४९ धावा झाल्या असताना देवदत्त पेडिकल बाद झाला त्याने १८ चेंडूत २१ धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. त्यानंतर आलेला श्रीकर भरत १६ चेंडूत अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्याला सुनील नरेनने बाद केले.
त्यांनंतर नरेनने विराट कोहलीला ३९ धावांवर बाद करत आरसीबीला अजून एक धक्का दिला. विराटने आपल्या खेळीत पाच चौकार लागावले. या हंगामात सहा अर्धशतके झळकावणारा मॅक्सवेलही काही खास कामगिरी करू शकला नाही तो अवघ्या १५ धावा करून बाद झाला. त्याने १८ चेंडूंचा सामना करत एक चौकार लगावला. मॅक्सवेललाही नरेनच बाद केले. त्यांनंतर फलंदाजीसाठी आलेल्या डिव्हिलर्सलाही नरेनने चालते केले. त्याने ९ चेंडूत ११ धावा केल्या. शाहबाझ अहमद आणि क्रिस्टिएन विशेष काही करू शकले नाही. तर हर्षल पटेल आठ धावांवर नाबाद राहिला.
सुनील नरेनच्या घातक गोलंदाजीने आरसीबीचे कंबरडे मोडले. त्याने २१ धावात चार गडी बाद केले. त्याला लॉकी फर्ग्युसनने चांगली साथ दिली त्याने ३० धावात दोन गडी बाद केले. आरसीबीने निर्धारित २० षटकात १३८ धावा केल्या.
केकेआरने १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सांघिक खेळ दाखवत चार गडी राखून सामना जिंकला. केकेआरकडून शुबमन गिलने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तसेच व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेनने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. नरेनने त्याच्या खेळीत ३ षटकार ठोकले. तसेच नितीश राणाने २३ धावांचे योगदान दिले.
केकेआरने सोमवारी (११ ऑक्टोबर) आरसीबी विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. पण त्याआधी त्यांना क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी भिडावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरचा नाद खुळा विक्रम! आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव संघ
ट्रॉफीचे अखेर स्वप्नच राहिले! नकोश्या विक्रमासह कोहलीच्या नेतृत्व कारकिर्दीची अखेर






