ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात सुनील नारायणनं इतिहास रचला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर केकेआर प्रथम फलंदाजीसाठी आली. एका टोकावरून सतत विकेट्स पडत होत्या तरी दुसऱ्या टोकावर सुनील नारायण टिकून राहीला. त्यानं आयपीएल कारकिर्दीतील आपलं पहिलं शतक झळकावलं.
नारायणनं राजस्थानविरुद्ध अवघ्या 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार लगावले. विशेष म्हणजे, सुनील नारायणच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलं शतक आहे. या आधी त्यानं लिस्ट-ए, फर्स्ट क्लास आणि टी-20 क्रिकेटमध्ये कधीही शतक झळकावलं नव्हतं. आयपीएल 2024 मध्ये शतक झळकावणारा नारायण आता 5वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, जोस बटलर, ट्रॅव्हिस हेड आणि रोहित शर्मा यांनी या हंगामात शतकं झळकावली होती.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सकडून केवळ व्यंकटेश अय्यर आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनीच शतकं झळकावली होती. अशाप्रकारे आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना शतक झळकावणारा सुनील नारायण केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे. तो 56 चेंडूत 109 धावा करून तंबूत परतला. आपल्या या खेळीत त्यानं 13 चौकार आणि 6 षटकार मारले.
सुनील नारायणनं कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. केकेआरसाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम व्यंकटेश अय्यरच्या नावावर होता. त्यानं 2023 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 49 चेंडूत शतक झळकावलं होतं. आता सुनील नारायणनही तेवढ्याच चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून अय्यरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याच्यानंतर या यादीत ब्रेंडन मॅक्क्युलमचा नंबर लागतो. त्यानं 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध 53 चेंडूत शतक ठोकलं होतं.
सुनील नारायणनं राजस्थानविरुद्ध शतक ठोकताच आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम रचला. तो आयपीएलच्या इतिहासात गोलंदाजीत एका डावात 5 बळी आणि फलंदाजीत शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसनची 10 वर्ष पूर्ण, विशेष व्हिडिओमध्ये पराग-चहलनं दिली मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल मधून घेतला ब्रेक, मानसिक थकव्यामुळे हवी विश्रांती