सध्या देशभरात आयपीएल 2024 ची धूम आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आगामी टी20 विश्वचषकाशी संबंधित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं नुकतीच भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान टी20 विश्वचषकाच्या संघाबाबत चर्चा झाली. याशिवाय स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फॉर्मबाबतही चर्चा झाली.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, तो गोलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकातून त्याला डच्चू मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
टी20 विश्वचषकासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी उपलब्ध नाही. तो सध्या सर्जरी नंतर रिकव्हरी करतोय. निवडकर्ते विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जोडीदाराची शोध घेत आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा फॉर्मही सध्या अत्यंत खराब राहिलाय. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात तेव्हाच संधी मिळेल, जेव्हा तो गोलंदाजीमध्ये योगदान देईल.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्यानं बीसीसीआयच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जर हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली, तर त्याला विश्वचषकाचं तिकिट मिळू शकतं. मात्र या हंगामात गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अखेरच्या षटकात हार्दिकला 26 धावा पडल्या होत्या. महेंद्रसिंह धोनीनं त्याला सलग 3 षटकार लगावले होते.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्वही करतोय. मात्र तो कर्णधार म्हणूनही आतापर्यंत आपली छाप सोडू शकलेला नाही. मुंबई इंडियन्स 6 सामन्यांत 2 विजय आणि 4 पराभवानंतर गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. त्यांच्याकडे फक्त 4 गुण आहेत. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुनील गावस्कर आणि इरफान पठान सारख्या माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल मधून घेतला ब्रेक, मानसिक थकव्यामुळे हवी विश्रांती
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?