पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांना केकेआरविरुद्ध अगदी थोड्या फरकानं पराभव पत्कारावा लागला. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. मुंबई विरुद्ध तर त्यांनी 20 षटकांत 277 धावा ठोकून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर उभारला होता. मात्र आता संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा मुख्य फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. संघासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो, कारण हसरंगा आपल्या जादुई फिरकी आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो त्याच्या संघाला एकहाती सामने जिंकून देण्यात सक्षम आहे. मात्र, आता तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. हसरंगा यापुढे आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार नाही.
वानिंदू हसरंगा डाव्या टाचेच्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला आहे. हैदराबादसाठी ही एक वाईट बातमी आहे, विशेषत: आयपीएलच्या मध्यात संघ त्याला खूप मिस करेल. संथ खेळपट्ट्यांवर हसरंगा खूप प्रभावी ठरू शकतो. आयपीएल संपल्यानंतर लगेच टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. हे लक्षात घेऊन श्रीलंका क्रिकेट बोर्ड हसरंगाबाबत कोणताही धोका पत्कारायच्या मूड मध्ये नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंका क्रिकेटचे सीईओ म्हणाले की, “हसरंगाची टाच सुजली होती आणि तो इंजेक्शन घेऊन खेळत होता. त्यामुळेच त्यानं आगामी विश्वचषकापूर्वी आपली समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. हसरंगा त्याची टाच दाखवण्यासाठी दुबईला जाणार आहे, जिथे तो तज्ञांचे मत घेईल.”
तसं पाहिलं तर, पहिल्या दोन सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हसरंगाची उणीव भासली नाही, मात्र एक फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नक्कीच उत्तम पर्याय होता. सनरायझर्सच्या प्लेइंग 11 मध्ये सध्या ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन आणि कर्णधार पॅट कमिन्स हे 4 विदेशी खेळाडू आहेत. हे सर्व सध्या चांगल्या फार्मात आहेत. त्यामुळे हसरंगाला जरी संधी मिळाली असती, तरी ती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असती. मात्र आता तो संपूर्ण हंगामातूनच बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडेवर हार्दिक पांड्याला बूइंग करणाऱ्या चाहत्यांविरुद्ध कारवाई होणार का? एमसीएनं थेटच सांगितलं
रोमांचक सामन्यात लखनऊचा पंजाबवर 21 धावांनी विजय, मयंक यादवनं पदार्पणातच घेतल्या 3 विकेट