इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा लवकरच यूएईमध्ये सुरू होणार आहे. कोरोना संक्रमणामुळे आयपीएलचा पहिला टप्पा २९ सामन्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला रद्द करण्यात आला होता. नंतर भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यासाठी आयपीएलच्या सर्व संघांची जोरदार तयारी चालू झाली आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ आधीच यूएईला पोहोचला आहे. त्याचबरोबर या दोन्ही संघांनी सरावाला देखील सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा संघ देखील लवकरच यूएईला उड्डाण भरणार आहे. याबाबत स्पोर्ट्सकिडा सोबत बोलताना हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने सनरायझर्सचा संघ १ सप्टेंबरला यूएईला जाणार असल्याचे सांगितले. गेल्या ४-५ वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी राहिलेल्या हैदराबाद संघाचे यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र खराब प्रदर्शन राहिले.
भारतात झालेल्या ७ सामन्यांमध्ये हैदराबादला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. यामुळे हैदराबादने डेव्हिड वॉर्नर ऐवजी केन विलियम्सनला कर्णधारपद सोपवले. गेल्या हंगामात यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये सनरायझर्सने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात हैदराबादचा संघ उरलेल्या ७ सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करून आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने सर्व खेळाडूंना ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईमध्ये एकत्रित येण्यास सांगितले आहे. ज्यानंतर सगळ्या खेळाडूंची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीतील अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडू दुबईसाठी रवाना होतील. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आखून देण्यात आलेल्या कोरोना नियमानुसार सर्व खेळाडूंना एका आठवड्यासाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर सर्व खेळाडू सरावाला सुरुवात करू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
–अँजेल्यू मॅथ्यूजला मिळाले नाही श्रीलंकेच्या वार्षिक करारात स्थान, निलंबित खेळाडूही यादीतून बाहेर
–तब्बल ६५ दिवसांनंतर पत्नीची भेट होताच सूर्यकुमारने लंडनच्या रस्त्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल
–Video: लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर लंडनमध्ये भारतीय चाहत्यांनी धरला ‘सात समंदर पार’ गाण्यावर ठेका






