गोवा (दिनांक ११ जानेवारी) इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) आजच्या सामन्यात सुपरसब इशान पंडितानं सामन्याला कलाटणी दिली. ८५ मिनिटे जमशेदपूर एफसीचे आक्रमण यशस्वीरित्या थोपवणाऱ्या एससी ईस्ट बंगालला ८८व्या मिनिटाला पंडितानं धक्का दिला. या पर्वातील पंडिताचा हा दुसरा गोल ठरला अन् त्यानं हे दोन्ही गोल ८५व्या मिनिटानंतरच केले आहेत. जमशेदपूरनं या विजयासह खात्यातील गुणसंख्या १९ करून थेट अव्वल स्थानी झेप घेतली. ईस्ट बंगालची विजयाची पाटी ११ सामन्यांनंतरही कोरीच राहिली.
एससी ईस्ट बंगालचा खेळ सातत्यानं सुधारताना दिसतोय… त्यांची विजयाची पाटी कोरी असली तरी मागील तीन सामन्यांत त्यांचा खेळ हा वाखाण्यजोगा होता. त्यांनी तगड्या संघांना बरोबरी माणण्यास भाग पाडले. दुसरीकडे जमशेदपूर एफसीनं मागील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर थरारक विजय मिळवून गमावलेला आत्मविश्वास कमावला. त्यामुळे ईस्ट बंगाल व जमशेदपूर यांच्यात आज दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघाचा बराच वेळ बचावात्मक खेळ करण्यात गेला. त्यातही जमशेदपूरनं पहिल्या ३० मिनिटांत पाच कॉर्नर मिळवले, परंतु एकाचेही गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. १५ व्या मिनिटाला रिकी लालावमावमाच्या पासवर जॉर्डन मरे गोल करण्यासाठी पुढे सरसावला, परंतु अंकित मुखर्जीनं त्याला ब्लॉक केले. जमशेदपूरला पुन्हा एक फ्री किक मिळाली, परंतु याहीवेळेस ते अपयशी ठरले. ईस्ट बंगलाची बचावभींत जमशेदपूरला ओलांडता येत नव्हती. पहिल्या हाफमध्ये जमशेदपूरनं सर्वाधिक ७५ टक्के चेंडूवर ताबा राखला होता आणि ७ कॉर्नर्स कमावूनही त्यांना गोल करता आला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ही लढत गोलशून्य बरोबरीची राहिली.
मध्यंतरानंतर जमशेदपूर एफसीनं आक्रमण अधिक वाढवले आणि ५२व्या मिनिटाना त्यांना जवळपास यश मिळालेच होते. ईस्ट बंगालचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यनं तो चेंडू सोडलाच होता पण, जॉर्डन मरेनं हेडरद्वारे टोलावलेला चेंडू क्रॉसबारवर आदळून माघारी फिरला. ५७व्या मिनिटाला आदील खानच्या दुखापतीनं ईस्ट बंगालची चिंता वाढवली, त्याला मैदान सोडावं लागलं. पुढच्याच मिनिटाला जमशेदपूरनं त्यांच्या मिरॅकल बॉय इशान पंडिताला मैदानावर उतरवले. याच खेळाडूनं मागील सामन्यात अखेरच्या मिनिटाला गोल करून थराराक विजय मिळवून दिला होता. ६४व्या मिनिटाला जॉर्डन मरेकडून जमशेदपूरसाठी पहिला शॉर्ट ऑन टार्गेट आला, परंतु भट्टाचार्यानं तो सुरेखरित्या अडवला. ७४व्या मिनिटाला मरेनं पुन्हा लाँग रेंजवरून थेट शॉर्ट घेतला, परंतु तो दिशाहीन ठरला. पण, त्याच्या या प्रयत्नानं ईस्ट बंगालची चिंता वाढवली. जमशेदपूरकडून सातत्यानं आक्रमण होत असूनही ईस्ट बंगालकडून प्रतीआक्रमण दिसले नाही. ते बचावात्मक खेळावर भर देताना दिसले.
अखेरच्या १० मिनिटांत ईस्ट बंगालकडून दबाव बनवण्याचा खेळ सुरू झाला. त्यांचा आक्रमण अचानक वाढले, परंतु जमशेदपूरची बचावफळी त्यासाठी तयार होती. पुन्हा एकदा सुपर सब इशान पंडितानं कमाल केली. ८८व्या मिनिटाला कॉर्नरवरून ग्रेग स्टीव्हर्टकडून आलेला चेंडू पंडितानं हेडरद्वारे गोलजाळीत पाठवून सामन्याचे चित्र बदलले. या गोलनंतर जमशेदपूरनं आघाडी यशस्वीपणे कायम राखून १-० असा विजय पक्का केला.
निकाल – जमशेदपूर एफसी १ ( इशान पंडिता ८८ मि.) विजयी विरुद्ध एससी ईस्ट बंगाल ०.