आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्सचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. चेन्नईचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने या सामन्यात मैदानावर उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. सुरेश रैना शनिवारी आयपीएलच्या इतिहासातील २०० वा सामना खेळला.
हा कारनामा करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. त्याच्यापूर्वी तीन दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे, ज्यात एमएस धोनी(२११), रोहित शर्मा(२०७) आणि दिनेश कार्तिक(२०३) यांचा समावेश आहे. सन २००८ पासून सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्सचा महत्वाचा भाग आहे. त्याने चेन्नईसाठी ११ हंगामांमध्ये भाग घेतला आहे, तर २ हंगामांमध्ये तो गुजरात लायन्सकडून खेळला. मागील वर्षी वैयक्तिक कारणास्तव त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.
अशी आहे रैनाची आयपीएल कारकीर्द
सुरेश रैनाच्या आयपीएल कारकीर्दीवर नजर टाकल्यास त्याने २००८ ते २०२१ या काळात चेन्नईसाठी १७१ आयपीएल सामने आणि गुजरात लायन्स संघाकडून २९ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सुरेश रैनापेक्षा अधिक सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार एमएस धोनीने (१८० सामने) खेळले आहेत.
रैनाने आतापर्यंत २०० आयपीएल सामन्यांमध्ये ३३.०७च्या सरासरीने ५४९१ धावा केल्या. यात ३९ अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. सुरेश रैनाने आयपीएल कारकिर्दीत ५०० हून अधिक चौकार आणि २०० पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत. या यादीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांची नावे समाविष्ट आहेत. एक क्षेत्ररक्षक म्हणूनही सुरेश रैनाच्या नावे आयपीएलचा विक्रम असून त्याने १०४ झेल पकडले आहेत.
मिस्टर आयपीएल आहे रैना
रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने ओळखले जाते. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ससोबत तीनवेळा (२०१०, २०११ व २०१८) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. चालू हंगामात मात्र त्याची बॅट काहीशी थंड पडलेली दिसतेय. सात सामन्यांत तो केवळ एका अर्धशतकासह १२३ धावा काढू शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गेलला मिळाली राणी! आनंदात करू लागला डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल
रोहितचा ‘हिट’ कारनामा! टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय