क्रिकेट जगतातून दु:खद बातमी पुढे येत आहे. रविवारी (२१ ऑगस्ट) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या बालपणीच्या प्रशिक्षक सतपाल कृष्णन यांचे निधन झाले आहे. प्रशिक्षक सतपाल हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून जालंधर येथील एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या उपचारासाठी रैनाने भरपूर मदतही केली. परंतु अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वत: रैनाने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. तसेच शोकही व्यक्त केला आहे.
https://twitter.com/akasureshraina/status/1561376529833402369?s=20&t=JprIKkj8uwbbR7Oc2gOgVA
आपल्याला बालपणापासून क्रिकेटचे धडे दिलेला प्रशिक्षक हरपल्याने रैना भावूक झाला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘माझे प्रशिक्षक कृष्णन सर यांचे निधन झाले असल्याचे ऐकून खूप दु:ख वाटले. मी आजवर प्राप्त केलेले यश आणि कठोर मेहनतीमागचे सर्वात मोठे कारण ते होते. मी त्यांना कधीही विसरू शकणार नाही. ते नेहमीच माझ्या आठवणीत राहतील. त्यांच्या कुटुंबिय आणि प्रियजनांना माझ्या संवेदना.’
https://twitter.com/ImRaina/status/1561368999698796545?s=20&t=jTUK5AjhlvfoUOYsETGWQA
रैनाने प्रशिक्षक सतपाल यांच्या उपचारात खूप मदत केली होती. परंतु तो त्यांना वाचवू शकला नाही. रैनाच्या ऑटोबायोग्राफी बिलीव्ह मध्ये सतपाल यांच्याबद्दल उल्लेख केला गेला आहे. रैनाने आपल्या ऑटोबायोग्राफीत म्हटले आहे की, लहानपणी मला क्रिकेटमधील बारकावे समजून सांगण्यात सतपाल यांनी खूप मदत केली होती. रैनाने शालेय जीवनात उत्तर प्रदेशातील गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, जिथे त्याने नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. यादरम्यान सतपाल यांनीच रैनाला ट्रेनिंग दिली होती.






