मुंबई । आयपीएल 2020 अद्याप सुरू झाले नाही, पण त्याआधी चेन्नई सुपरकिंग्जचा संघ चिंतेत पडला आहे. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड हे त्याचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि त्यानंतर संघातील वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला.
सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव आयपीएलचा हा हंगाम खेळणार नाही, पण आयपीएलमधून माघार घेण्याची काही वेगळी कारणे सांगितले जात आहे. तसे पाहता सुरेश रैना चेन्नई संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघातील संतुलनावर परिणाम होऊ शकतो. पण दोनवेळा कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार गौतम गंभीरला तसे वाटत नाही. सुरेश रैनाच्या जाण्याने चेन्नई संघावर परिणाम होणार नाही, असा त्याचा विश्वास आहे.
सुरेश रैनाच्या अनुपस्थितीवर गौतम गंभीरने एक मोठे विधान केले की, धोनीच्या संघावर त्याचा परिणाम होणार नाही. स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमात तो म्हणाला की, सुरेश रैनाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खूप धावा केल्या आहेत. तो चेन्नईकडून खेळला असो किंवा गुजरात लायन्सचा भाग असो, त्याने खोर्याने धावा केल्या. मात्र, त्याच्या जाण्याने चेन्नई संघाला फारसा त्रास होणार नाही. कारण चेन्नईत चांगले फलंदाज आहेत.
तो म्हणाला, “चेन्नई संघात अंबाती रायुडू आणि केदार जाधवसारखे फलंदाज आहेत. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरचे क्रिकेटपटू मोठ्या संख्येने आहेत. स्वतः धोनीही त्या संघात आहे. रैनाचे जाणे मोठे नुकसान आहे, परंतु आपण जितके विचार करतो तितके मोठे नुकसान नाही.”
तसेच गौतम गंभीरने धोनीला तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्लाही दिला. धोनी बऱ्याचदा आयपीएलमध्ये पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला येतो.