अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (१८ मार्च) खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ८ धावांनी पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली. मात्र, या सामन्यात अर्धशतक ठोकून सूर्यकुमार यादवने एका खास यादीत आपले नाव नोंदविले.
सूर्यकुमारचे धमाकेदार अर्धशतक
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सूर्यकुमार यादवने भारतासाठी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केले होते. मात्र, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसावे लागलेले.
त्यामुळे, सूर्यकुमारने खर्या अर्थाने गुरुवारी आपले फलंदाजी पदार्पण केले. सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. सूर्यकुमारने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावामध्ये अत्यंत आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने अवघ्या ३१ चेंडूमध्ये ६ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने ५७ धावा फटकावल्या.
खास यादीत मिळविले स्थान
सूर्यकुमारने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० डावात अर्धशतक झळकावून एका खास यादीत स्थान मिळवले. भारतासाठी पहिल्या टी२० डावात अर्धशतक ठोकणारा तो पाचवा फलंदाज बनला. यापूर्वी, भारतीय संघासाठी रॉबिन उथप्पाने पाकिस्तानविरुद्ध व रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००७ टी२० विश्वचषकावेळी आपापल्या पहिल्या डावात अर्धशतके ठोकली होती.
त्यानंतर २०११ सालामध्ये अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करताना अर्धशतक झळकावले. त्यानंतर, सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ईशान किशनने पदार्पण करताना ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली होती. त्यानंतर, या सामन्यात सूर्यकुमारने ५७ धावांची खेळी करून आपले पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ खेळाडूचे पुनरागमन होताच भारतीय संघ आणखी मजबूत होईल, बॉलिवूड अभिनेत्याचा दावा
उडता बेन! स्टोक्सचा एकहाती झेल पाहून व्हाल चकित, व्हिडिओ होतोय व्हायरल