सध्या 2022 वर्षातील अखेरचे दोनच दिवस शिल्लक आहेत. क्रिकेटजगतात या संपूर्ण वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या वर्षभरात क्रिकेटमध्ये अनेक महत्वाच्या स्पर्धा खेळल्या गेल्या, ज्यामध्ये तीन विश्वचषकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावेळीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. आयसीसीने पुरुष टी20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारताचा टी20 संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे.
यावर्षी टी20 प्रकारात अनेक खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. त्यातील चार खेळाडूंना आयसीसीने पुरूष टी20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवडले आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबरोबर झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आणि पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे.
मागील वर्षीच भारताच्या टी20 संघात पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारसाठी 2022 विशेष ठरले आहे. आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली. तो या वर्षात पुरूषांमध्ये टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो या प्रकारात एका वर्षात 1000 धावांचा टप्पा गाठणारा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने 31 सामन्यात 46.56च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश देखील आहे.
सूर्यकुमारने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तब्बल 68 षटकार मारले आहेत. यामुळे तो या प्रकारात एकाच वर्षी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत त्याने 6 सामन्यात 3 अर्धशतके ठोकली. पुढेही त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली आणि तो यावर्षी आयसीसी टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 890 गुण मिळवले.
The ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022 nominees include:
???? An exciting young talent
???? Two reliable batters
???? A swashbuckling power-hitter#ICCAwards | Find out ????— ICC (@ICC) December 29, 2022
सिकंदर रझाने यावर्षी त्याच्या टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 24 सामन्यांत 735 धावा करताना 25 विकेट्सही घेतल्या. टी20 विश्वचषकात जेव्हा झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले होते, त्या सामन्यात रझाने 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानी खेळाडूला धावबाद करत संघाला एका धावेने विजय मिळवून दिला होता.
टी20 विश्वचषक 2022चा मालिकावीर सॅम करन ठरला. त्याने डेथ ओव्हर्समध्ये उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 10 धावा देत 5 विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी बजावली. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एकाच सामन्यात 5 विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात 4 षटकांत 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावर्षी त्याने 19 सामन्यांत 25 विकेट्स घेत 67 धावा केल्या.
पाकिस्तानच्या रिझवानने 25 सामन्यांत 996 धावा केल्या असून विकेटकीपिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली. त्याने 9 झेल पकडत 3 स्टम्पिंगही केले. त्याने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 10 अर्धशतके केली असून तो 2022मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर तो आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमावरीतही दुसऱ्या स्थानावर आहे.
या चारही जणांची कामगिरी यंदा विशेष राहिली असून हा पुरस्कार कोण जिंकेल हे सांगणे कठीण आहे. (Suryakumar Yadav nominated for ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा बघायला मिळणार भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार, मेलबर्नच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु
जुने इंजिन काढणार! श्रीलंकेविरुद्ध निवडलेल्या संघातून बीसीसीआयचे उद्दिष्ट स्पष्ट, आता नेतृत्व युवा खेळाडूंकडे