मागील अनेक वर्षापासून भारतीय संघाचे दार ठोठावणाऱ्या सुर्यकुमार यादवला अखेर सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. सुर्यकुमार मागीलवर्षी झालेल्या इंडियम प्रीमीयर लीगपासून चर्चेत आहे. तो सध्या भारतीय संघातील फिट क्रिकेटपटूंमध्येही गणला जातो. त्याने लॉकडाऊननंतरही त्याची तंदुरुस्ती कायम राखल्याचे आयपीएलमध्येही दिसले होते. आता यामागील काय कारण होते, याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
सुर्यकुमारने सांगितले आहे की त्याने जवळपास ३ महिन्यात तब्बल १२ किलो वजन कमी केले. भारतात मागीलवर्षी मार्च महिन्यानंतर पुढे काही महिने कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात क्रीडा स्पर्धाही थांबल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटपटूही आपापल्या घरी होते.
या लॉकडाऊनच्या कालावधीत तंदुरुस्ती कशी राखली याबद्दल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने सांगितले की ‘लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसात मी जवळपास जे दिसत होते, ते सर्वकाही खाल्ले, म्हणजे गोड, कार्ब्स, भात, असे सर्वकाही. पण मग विचार आला की लॉकडाऊनच्या कालावधीचा उपयोग करुन मी माझ्या शरीरावर काम करु शकतो.’
३० वर्षीय सुर्यकुमार पुढे म्हणाला, ‘मी गोड खाणे, साखर खाणे आणि ९० टक्के भात आणि आटा खाणे बंद केले. मी सर्वात जास्त कार्बयुक्त अन्न सोडले आणि सामान्य डाळ, भाजी किंवा पनीरसह ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरी खाण्यास सुरुवात केली. तसेच मी दिवसातून २ वेळा वर्क-आऊट करण्यास सुरुवात केली. पूर्वी मी आठवड्यातून ५ वेळेला वर्क-आऊट करायचो.’
खाण्यात बदल केल्याचे सुर्यकुमारला फळ मिळाल्याचे त्याने सांगितले. आता तर सुर्यकुमार भारताकडून पदार्पण करण्यासही सज्ज झाला आहे. आता त्याला कोणत्या सामन्यातून पदार्पण करण्याची आणि कोणत्या क्रमांकावर संधी मिळते हे पाहावे लागणार आहे.
सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. आता दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) होणार आहे.
सुर्यकुमार कारकिर्द –
सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९८ सामन्यात त्याने ३७.५५च्या सरासरीने २७७९ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १७० सामन्यात ३१.५६ च्या सरासरीने ३५६७ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत.
तसेच सूर्यकुमारने १३ व्या आयपीएल हंगामात १६ सामने खेळताना १४५.०१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४८० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भुतकाळात डोकावताना: ईडन गार्डन जळत होत आणि कांबळीसोबत सारा भारत रडत होता…
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर आर्चरने सांगितले यशाचे गुपित, म्हणाला…