नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. संपूर्ण हंगामातील धडाकेबाज कामगिरीमुळे तो चर्चेत राहिला. आयपीएलशिवाय मागील दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील त्याची कामगिरी चमकदार राहिली आहे. आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषित झालेल्या भारतीय संघात सूर्यकुमारची वर्णी लागेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. निवड न झाल्याने निराश झालेल्या सूर्यकुमारला भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने खास संदेश पाठवला होता. स्वतः सूर्यकुमारने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
धावा बनवत रहा- सचिनने दिलेला सूर्यकुमारला खास संदेश
आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या, सूर्यकुमारने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, “राष्ट्रीय संघात निवड होणे हे माझ्या हातात नाही. माझे काम चांगला खेळ करण्याचे आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीदेखील मला त्यावेळी संदेश पाठवला होता. ते म्हणाले, ‘हताश होऊ नकोस. तू अशीच मेहनत करत रहा. धावा बनवत रहा.’ आयपीएलनंतर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी असाच फॉर्म राखण्याचा प्रयत्न करेल. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवणे, माझे लक्ष्य आहे.”
संघात निवड न झाल्याने दुःखी होतो
इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवड होणार आहे, हे मला माहीत होते. त्याचवेळी आयपीएल खील सुरू होती. मी या गोष्टीचा आधी जास्त विचार केला नव्हता. मात्र, माझी कामगिरी चांगली होत होती. संघनिवड झाली आणि माझे नाव नसल्याने मी निराश झालो. काही वेळ एकांतात बसल्यानंतर मी विचार केला की, मला याहून चांगले खेळावे लागेल. जेणेकरून पुढील वेळी माझ्या नावाचा विचार केला जाईल.”
विराटसोबत नव्हता झाला वाद
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीसोबत झालेल्या ‘तूतू-मैंमैं’ विषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “असा काही वाद झाला नव्हता. ती फक्त मस्ती चालली होती. संघाला अव्वल स्थानी नेण्याचा दबाव या सामन्यात माझ्यावर होता. विराट एक सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो ज्याप्रकारे खेळतो, ते पाहून अनेकजण उत्साहित होतात.”
देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव असलेल्या सूर्यकुमारने मागील तीन आयपीएल हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी केली आहे. सूर्यकुमारची भारतीय संघात निवड न झाल्यानंतर ट्विटरवर #JusticeForSKY अशा स्वरूपाची मोहीम चालवली गेली होती. सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
चर्चा तर होणारंच! विराट कोहलीला ट्रोल करणारं ट्वीट सूर्यकुमार यादवकडून लाईक
“सूर्यकुमार यादव होईल मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केलीय भविष्यवाणी
दिग्गजाने निवडला सर्वोत्कृष्ट आयपीएल संघ; विराटला डच्चू तर सूर्यकुमार यादवला दिले ‘हे’ स्थान