शनिवारी (२० फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध भारत संघात होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. येत्या १२ मार्चपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी १९ जणांच्या भारतीय संघात मुंबईच्या सुर्यकुमार यादवलाही स्थान देण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सुर्यकुमार भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत होता. अखेर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने भारतीय संघात निवड झाल्यानंतर एक खास ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये सुर्यकुमारने त्याचा डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानात बसलेला फोटो शेअर केला असून त्यासाठी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘ही भावना शानदार आहे.’
The feeling is surreal????????????❤️ pic.twitter.com/RccRbyYpx4
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) February 21, 2021
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्याने आला होता चर्चेत –
खरंतर मागील अनेक महिन्यांपासून चाहत्यांसह काही दिग्गजांनी सुर्यकुमारला भारतीय संघात संधी मिळावी अशी मागणी केली होती. त्याला आयपीएल २०२० चा हंगाम सुरु असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेल्या कोणत्याच क्रिकेट प्रकारच्या भारतीय संघात निवडण्यात आले नव्हते. त्यानंतर अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी अनेक दिग्गजांनीही त्याला भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते, असे म्हटले होते. अखेर सुर्यकुमारचे स्वप्न पूर्ण होत असून आता त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
सुर्यकुमार कारकिर्द –
सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १७० सामन्यात ३१.५६ च्या सरासरीने ३५६७ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी
इंग्लंड विरुद्धची टी२० मालिकेत सुर्यकुमारसह राहुल तेवातिया, इशान किशन आणि वरुण चक्रवर्तीय या नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. त्यामुळे या चौघांनाही आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी असणार आहे. याबरोबरच जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन झाले आहे.
मोटेरा स्टेडियवर होणार सर्व सामने –
भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारे सर्व ५ टी२० सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार असून १४, १६, १८ आणि २० मार्चला अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा सामना खेळला जाणार आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल पुनरागमनाने पुजराच्या पंखात भरलं बळ; हंगाम संपताच खेळणार ही परदेशी टुर्नामेंट
चहलची पत्नी धनश्री रंगली क्रिकेटच्या रंगात; डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आयपीएल लिलावाच्या इतिहासात खर्च झालेली रक्कम ऐकून चक्रावून जाल; प्रत्येक देशांना मिळालाय इतका वाटा






