इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही बीसीसीआयची लोकप्रिय टी२० लीग आहे. जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक क्रिकेट लीगचा मान या स्पर्धेला मिळाला आहे. या लीगमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात आणि आपल्या कामगिरीने फ्रेंचायझींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी चेन्नईत मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.
लीगच्या चौदाव्या हंगामात खेळण्यासाठी १,०९७ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. त्यातील, २९२ खेळाडूंना अंतिम यादीसाठी निवडण्यात आले होते. प्रत्यक्ष लिलावात फ्रेंचायझींनी २२ परदेशी खेळाडूंसह एकूण ५७ खेळाडूंची निवड केली आणि आपापली पथके पूर्ण केली.
या लिलावात एकूण १४५ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले. यासह, आयपीएलच्या चौदा वर्षांच्या इतिहासात लिलावादरम्यान ६,००० कोटी रुपयांचा आकडादेखील ओलांडला गेला आहे. एका क्रीडा संकेतस्थळाच्या माहितीनुसार, २००८ आयपीएलपासून ७८९ खेळाडूंवर ६,१४४ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.
आज आपण जाणून घेऊया की, कोणत्या देशाचा किती खेळाडूंवर किती रुपये खर्च केले गेले आहेत.
१) भारत
आयपीएलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वाधिक रक्कम ही भारतीय खेळाडूंवर खर्च केली गेली आहे. भारतीय खेळाडूंना १४ वर्षात ३,४३३ कोटी रुपये दिले गेले आहेत. खेळाडूंवर खर्च केलेल्या एकूण रकमेच्या ५५.७ % इतकी ही रक्कम आहे.
२) ऑस्ट्रेलिया
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रत्येकवेळी फ्रेंचायझींना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात. म्हणूनच लीगच्या चौदा वर्षाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन खेळाडू कमाईच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. आतापर्यंत ९४ ऑस्ट्रेलियन खेळाडू वेगवेगळ्या फ्रेंचायझींनी विकत घेतले असून, त्यांनी एकूण ९०५.९ कोटी रुपये कमावले आहेत.
३) दक्षिण आफ्रिका
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर १६.२५ कोटी रुपये खर्च केले आणि त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू बनविले. मॉरिसव्यतिरिक्त रबाडा, डिव्हिलियर्स, डिकॉकसारखे बरेच खेळाडू वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. हेच कारण आहे की, आयपीएलच्या माध्यमातून सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्या देशांच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या ५६ खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेतला असून त्यांनी त्यातून ५३९ कोटींची कमाई केली आहे.
४) वेस्ट इंडीज
आयपीएलमध्येही वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आपल्या नीडर व अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी मागणी असते. या कारणामुळे वेस्ट इंडिजचा संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या ३३ खेळाडूंनी आतापर्यंत ४८५.५४ कोटी रुपये आयपीएलमधून कमावले आहेत.
५) इंग्लंड
सुरुवातीला आयपीएलच्या नावाने नाके मुरडणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नंतरच्या काळात आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यास परवानगी दिली. इंग्लिश खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला आहे. बेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस वोक्स, मोईन अली व करन बंधू यासारखे खेळाडू कोट्यावधी रुपये घेत सध्या विविध संघामध्ये खेळत आहेत. इंग्लंडच्या ३३ खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये भाग घेतला आहे. ज्यातून त्यांनी २८५.९६ कोटी इतकी घसघशीत कमाई केलेली दिसून येते.
६) न्यूझीलंड
न्यूझीलंडचे अनेक मोठे खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. केन विलियम्सन असो किंवा न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज असो, ते नेहमी फ्रेंचायझींना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. चौदाव्या आयपीएलच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने युवा अष्टपैलू कायले जेमिसनला १५ कोटींमध्ये खरेदी केले. यावरून असा अंदाज बांधता येतो की या टी२० लीगमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही मोठी मागणी आहे. आतापर्यंत सर्व संघांकडून मिळून न्यूझीलंडचे ३१ खेळाडू खेळले आहेत ज्यांच्यावर २११.६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
७) श्रीलंका
भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेच्या ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपली उपस्थिती दाखवली आहे. कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, मुथय्या मुरलीधरन या खेळाडूंनी या स्पर्धेवर आपली छाप पाडली. श्रीलंकेच्या २७ खेळाडूंनी आयपीएलमध्ये हजेरी लावत १९५.९३ कोटी रुपये पदरात पाडून घेतले आहेत.
८) अफगाणिस्तान
अफगाणिस्तान संघाने टी२० क्रिकेटमध्ये अगदी वेगाने आपला ठसा उमटविलेला दिसून येतो. राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी अफगाणिस्तान क्रिकेटला नवीन उंचीवर नेले आहे. हेच कारण आहे की, इथले खेळाडू देखील या प्रतिष्ठित लीगचा भाग बनत आहेत. सध्या राशिद, नबी आणि मुजीब हे हैदराबादचा भाग आहेत. अफगाणिस्तानातून आतापर्यंत केवळ चार खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेऊ शकले आहेत आणि त्यांनी ५८.४० कोटींची कमाई केली आहे.
९) बांगलादेश
भारताच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या बांगलादेशचे सहा खेळाडू आत्तापर्यंत आयपीएलचा भाग राहिले आहेत. शाकिब अल हसन व मुस्तफिजुर रहमान या दोघांनाच या स्पर्धेमध्ये आपली ओळख बनविता आली. बांगलादेशच्या खेळाडूंनी आयपीएलच्या माध्यमातून ३४.७८ कोटी रुपये कमविले आहेत.
या नऊ देशांच्या व्यतिरिक्त पाकिस्तान, नेपाळ, नेदरलँड, अमेरिका, यूएई आणि झिम्बावेचे खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात कोहली तर पाकिस्तानमध्ये आझमचा डंका; टी२० लीगच्या ‘या’ मोठ्या विक्रमात दोघेही अव्वल
जोकोविचचा नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर कब्जा; मेदवेदेव फायनलमध्ये पराभूत
भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, माजी खेळाडूचा दावा