अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात, भारताने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला जसप्रीत बुमराहने दुसरा धक्का दिला आहे. बुमराहने रचिन रवींद्रला आपला शिकार बनवले. त्याआधी, डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलने फिन ॲलनला बाद केले होते.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने २५५ धावांचा डोंगर उभा केला असून न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अभिषेक आणि संजूने टीम इंडियाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकांत ९८ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या फायनलमधील इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. अभिषेकने २१ चेंडूत ५२, संजू सॅमसनने ४७ चेंडूत ८९, तर ईशान किशनने २५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेने ८ चेंडूत २६ धावा कुटल्या. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघ या सामन्यात कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे, तर न्यूझीलंडने आपल्या संघात एक बदल केला आहे.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड: टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जॅकब डफी.






