मुंबई । बॉलिवूडमधला महेंद्रसिंग धोनी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईमध्ये त्याच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या करून जीवन का संपवले, याचे कारण अद्याप कळाले नाही. मानसिक ताणतणावातून त्याने असा टोकाचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुशांत सिंग राजपूत हा क्रिकेटचा फारच शौकीन होता. त्याने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची भूमिका निभावली होती. धोनीच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट खूपच गाजला. या चित्रपटामुळे सुशांतची एक वेगळी ओळख निर्माण झाली. धोनीने कष्टाच्या जोरावर भारतीय संघात कसे स्थान निर्माण केले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतला त्याच्या कुटुंबाने श्रद्धांजली देण्यासाठी सिनेमा, खेळ आणि विज्ञान या क्षेत्रात युवा प्रतिभेला मदत करण्यासाठी सुशांत सिंग राजपूत फाऊंडेशनची स्थापना करत आहेत. चित्रपट, खेळ आणि विज्ञान या विषयाशी सुशांतला विशेष अभिरुची होती.
पटना येथील सुशांतचे बालपणीचे घर आता स्मारकात बदलणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. सुशांतची आठवण म्हणून त्याच्या काही वस्तू, आवडीची पुस्तके, टेलिस्कोप अन्य वस्तू या स्मारकात ठेवण्यात येणार आहेत.
सुशांत सिंग राजपूतच्या परिवाराने प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “सुशांतने अनेक स्वप्न पाहिले होते. वाघासारखे त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला. तो आमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी होता. त्याच्या अनेक किमती वस्तू आहेत. चित्रपट, विज्ञान आणि क्रीडा या क्षेत्रातील युवावर्गास आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करणारा आहोत.”