भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) सध्या ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न (रिहॅब) करत आहे. त्याच्या फलंदाजीतील प्रगती चांगली असून त्याने 4 सत्रांमध्ये फलंदाजीचा सराव केला आहे. तसेच, 2 फेब्रुवारीला त्याने 4 षटके गोलंदाजीही केली. मात्र, टी-20 विश्वचषकात तो खेळणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय 4 फेब्रुवारीला घेतला जाण्याची शक्यता आहे.
4 फेब्रुवारी रोजी सुंदरचे एक गोलंदाजी सत्र होईल. यामध्ये त्याच्या हाताच्या फॅक्चर झालेल्या भागावर गोलंदाजी करताना किती ताण येतोय, हे तपासले जाईल. त्यानंतरच तो विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, याचा निर्णय होईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना सुंदरला दुखापत झाली होती. त्यानंतर फलंदाजी करतानाही तो वेदनेने विव्हळत असल्याचे दिसले होते. याच दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकला होता. संघ व्यवस्थापन त्याच्यासाठी अर्ध्या स्पर्धेपर्यंत वाट पाहण्यासही तयार असल्याची चर्चा होती.
जर वॉशिंग्टन सुंदर वेळेत फिट होऊ शकला नाही, तर त्याच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या दोन खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत. आयुष बदोनी: त्याने अमेरिकेविरुद्धच्या सराव सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली आहे.
रियान पराग: दुखापतीतून सावरून पराग आता संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. या दोघांपैकी एकाला सुंदरचा बदली खेळाडू म्हणून विश्वचषक संघात संधी मिळू शकते.






