भारतीय जलतरण महासंघातर्फे ४४ व्या कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचेही आयोजन
पुणे, २६ जून २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशन तर्फे येत्या २८ जून ते ०६ जुलै १०७ या कालावधीत ३४व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर आणि ४४व्या कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे शहरांत आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे होणार्या या स्पर्धेच्या निमित्ताने २०१५ नंतर जलतरण स्पर्धेचे पुण्यात पुनरागमन होत आहे.
प्रामुख्याने जलतरण,डायव्हिंग आणि वॉटरपोलो या क्रीडा प्रकारांमध्ये होणार्या या स्पर्धेत देशभरातील १४०० हुन अधिक जलतरणपटू सहभागी होणार आहेत,अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया,आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व आयआयएफएसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कुलकर्णी, ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल,स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे यांनी दिली.
टोकियो २०२० ऑलिंपिकमध्ये जलतरण क्रीडा प्रकारात तीन पदकांची अधिक भर पडणार असल्यामुळे एकूण ऑलिंपिक सुवर्णपदकांच्या संख्येत जलतरणाने अॅथलेटिक्सला मागे टाकले आहे.आता अॅथलेटिक्समध्ये ४८ पदके तर, जलतरण प्रकारात ४९ ऑलिंपिक पदके असतील.
पुण्यातील सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २८ ते ३० जून २०१७ दरम्यान पार पडणार आहे. तर, कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धा ३ ते ६जुलै २०१७ या कालावधीत होणार आहे. यांतील सर्व क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे होणार आहे. तसेच, यातील सर्व प्राथमिक फेर्या सकाळच्या सत्रात सकाळी ८ वाजल्यापासून होणार असून अंतिम फेर्या सायंकाळी ५ पासून घेण्यात येणार आहेत.
डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धा सब-ज्युनिअर स्पर्धेदरम्यान होणार असून राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा कुमारांच्या स्पर्धेदरम्यान होणार आहे. सर्व स्पर्धांचे थेट प्रक्षेपण www.glenmarkaquatic.org या संकेत स्थळावरून केले जाणार आहे. दररोजचे निकाल व स्पर्धांची सविस्तर माहितीwww.swimmingfederation.in या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे. तसेच, @nacindia या ट्विटर हँडलवर स्पर्धेचे लाईव्ह अपडेटस उपलब्ध असणार आहेत.
स्पर्धेत महाराष्ट्रातील नील रॉय,मिहिर आंब्रे,त्रिशा कारखानीस,आर्यन भोसले,केनिषा गुप्ता,अंशुमन जिंग्रन,पलक धमी,वेदिका अमीन,संजिती शहा,अपेक्षा फर्नांडिस यांसह श्रीहरी नटराज,प्रसिदा कृष्णा,तनिष जॉर्ज,नयन विघ्नेश,उत्कर्ष पाटील,क्रीश सुकुमार,मयुरी लिंगराज,खुशी दिनेश,रिध्दी बोरा,नीना वेंकटेश,रिधिमा कुमार हे मानांकित खेळाडू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत.
ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशन हा ग्लेनमार्क फार्मास्युटीकल्स लिमिटेड या उदयोगसमूहाचा औद्योगिक सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून ग्लेनमार्कने देशांतील जलतरण क्षेत्रासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. याशिवाय ग्लेनमार्क फाऊंडेशनच्या वतीने मुंबई येथे हाय परफॉर्मन्स अॅक्वेटिक सेंटर आणि दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून डॉ.एस.पी.मुखर्जी जलतरण प्रशिक्षण संकुल उभारण्यासाठी आपले योगदान दिले आहे. ग्लेनमार्कच्या वतीने संपूर्ण वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. जीएएफ शिवाय भारतीय क्रीडा प्राधिकरण, स्पीडो आणि निर्थापुल्स यांचेही या राष्ट्रीय जलतरण स्पर्धला साहाय्य प्राप्त झाले आहे.
ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा उदघाटन समारंभ बुधवार, २८ जून २०१७ रोजी होणार आहे. तसेच, फिना डे (जागतिक जलतरण दिन) समारंभ स्पर्धेच्या ठिकाणीच २ जुलै २०१७ रोजी साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
* पाणी बचत या संकल्पनेवर आधारित मुलांसाठी खास चित्रकला स्पर्धा
* ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जलतरण प्रशिक्षण सत्राचे आयोजन
* खास मुलांसाठी पोहायला शिका या उपक्रमाचे आयोजन
* जीव रक्षणासाठी जलतरणाचा उपयोग या प्रशिक्षण सत्राचे आयोजन