वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-२० मालिका खेळायची आहे. अनुभवी यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (wridhiman saha) सध्या कसोटी संघातून बाहेर आहे आणि श्रीलंकेविरुद्धही त्याला संधी मिळणार नाहीय. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद किरमाणी (syed kirmani) यांनी साहाला संघाने संधी न मिळण्यासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी साहाचे तोंडभरून कौतुक केले.
माध्यमांतील वृत्तानुसार अशी माहिती समोर आली आहे की, संघ व्यवस्थापनाकडून साहाला सांगितले गेले आहे की, भविष्यातील मालिकांसाठी त्याला संधी मिळणे कठीण आहे. अशात तो पुन्हा भारतीय जर्सीमध्ये मैदानात दिसण्याची खूपच कमी शक्यता आहे. सय्यद किरमाणींनी मिड डेसोबत बोलताना साहाचे कौतुक केले आणि त्याला नेहमी लक्षात ठेवले जाईल असेही सांगितले.
संघातील राजकारणाला बळी पडला रिद्धिमान साहा
किरमाणी म्हणाले की, “यात काहीच शंका नाहीय की, तो एक अप्रतिम यष्टीरक्षक आहे. मात्र, पंत एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याला अधिक संधी मिळत आहेत. वयाच्या ३७ व्या वर्षीही साहा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याने निराश नाही झाले पाहिजे. दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल यांनाही अशाच प्रकारे हटवले गेले होते. तू भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षात उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. तुला ड्रॉप केले गेले, कारण तू एका खास ग्रुपचा भाग नव्हता. तू राजकारणाला बळी पडला. मी नेहमीच तुला एका उत्कृष्ट यष्टीरक्षकाच्या रूपात लक्षात ठेवेल.”
१२ वर्षात खेळले ४० कसोटी सामने
दरम्यान, साहाच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने २०१० मध्ये कसोटी पदार्पण केले होते. पण एमएस धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. धोनीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एका मर्यादित षटकांतील खेळाडूच्या रूपात केली होती, परंतु वेळेनुसार त्याला संघात महत्व मिळत गेले आणि कसोटी संघातही त्याने जागा पक्की केली. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही वर्षी साहा कसोटी संघाचा नियमित सदस्य बनला, पण नंतर रिषभ पंतने त्याची जागी घेतली. पंत सध्या संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि साहा मात्र संघातून बाहेर आहे.
रिद्धिमान साहाने आतापर्यंत १२ वर्ष भारतीय कसोटी संघासाठी योगदान दिले आहे. यादरम्यान त्याला भारतासाठी फक्त ४० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने ३ शतक, ६ अर्धशतकांच्या मदतीने आणि २९ च्या सरासरीने १३५३ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजविरुद्ध गेली १६ वर्षे भारतीय संघ राहिलाय अजेय, मोठ्या विक्रमात पाकिस्तानची केलीय बरोबरी
‘मैं फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा’, रोहितचं कौतुक करताना पंजाब किंग्जचा राहुलला अप्रत्यक्ष टोला
धोनी किंवा कोहलीकडून ती गोष्ट पाहिजे होती, अखेर…; दीपक हुड्डाची लक्षवेधी प्रतिक्रिया






