येत्या १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेसाठी सगळ्या संघाना जैव सुरक्षित वातावरणात ठेवण्याचे नियोजन बीसीसीआयने केले आहे. मात्र आता हे संघ मुक्काम करत असलेल्या हॉटेलमधील कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्लेट ग्रुप मध्ये समावेश असलेल्या मणिपुर, मिजोराम आणि मेघालय हे संघ चेन्नईतील एका हॉटेलात वास्तव्यास आहेत. या हॉटेलमधील तब्बल २० कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. मात्र तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने कुठलीही भीती बाळगण्याचे कारण नसून सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली हे खरे असले तरी खेळाडूंना त्यापासून धोका नाही. खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले असून, कर्मचाऱ्यांचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क आला नाही. एका खेळाडूने देखील याची पुष्टी केली आहे. सगळे खेळाडू आपापल्या खोल्यांमध्येच असल्याचे त्याने सांगितले. आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही धोका जाणवला नसून आमची तपासणी देखील झाली आहे, असेही या खेळाडूने सांगितले.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या प्लेट ग्रुपमधील संघांचे सामने चेन्नईत विविध ठिकाणी ११ जानेवारीपासून खेळविण्यात येतील. त्यामुळे चेन्नईत या ग्रुपमधील संघ वास्तव्यास आले आहेत. मात्र हॉटेलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी चेन्नईतीलच आईटीसी ग्रँड चोला या हॉटेलमधील ८० लोकांना कोरोनाची लागण झाली होती.
मात्र या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंचे जेवण वेगळ्या किचनमध्ये तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे किचन देखील जैव सुरक्षित वातावरणातच असेल, याची खबरदारी घेतल्या जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनीत भारतीय खेळाडूंवर लागू झालेत निर्बंध; हॉटेलच्या बाहेर जाण्यासही परवानगी नाही
“युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा”, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती