शुक्रवारी (4 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियन संघाला अफगाणिस्तानकडून कडवे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाने हा सामना कसाबसा जिंकला आणि उपांत्य सामन्याच्या शर्यतीत स्वतःचे स्थान कायम ठेवले. अफगाणिस्तान संघ लक्ष्यापासून चार धावा दूर राहिल्यामुळे ऑस्ट्रेलिया अजूनही उपांत्य सामन्यात जाऊ शकतो. या महत्वाच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याची खास प्रतिक्रिया समोर आली आहे.
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू राशिद खान (Rashid Khan) या सामन्याच जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला. राशिदने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या 23 चेंडूंमध्ये 48 धावा कुटल्या. राशिदच्या या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तान शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देऊ शकला. शेवटच्या षटकात विजयासाठी अफगाणिस्तानला 22 धावा हव्या होत्या. राशिदने या षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारत पराभव चार धावांवर आणून ठेवला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्क स्टॉयनिस (Marcus Stoinis) या षटकात गोलंदाजी करत होता. स्टॉयनिसने या षटकात 17 धावा खर्च केल्या. कर्णधार मॅथ्यू वेड (Matthew Wade) याच्या मते शेवटचे षटक अष्टपैलूला देणे संघाला महागात पडू शकत होते.
सामना संपल्यानंतर मॅथ्यू वेड माध्यमांशी बोलत होता. तो म्हणाला की, “आम्ही स्टॉयनिसला शेवटचे षटक दिले. शेवटचे षटक टाकण्यासाठी अष्टपैलू खेळाडू असणे म्हणजे चिंतेची बाब असते. मी यापूर्वी तीन-चार वेळा त्याला असे करताना पाहिले आहे. पण कधीच शेवटचे षटक टाकताना त्याच्यात पूर्ण आत्मविश्वास दिसला नाहीये. आम्ही आज रात्री इथेच थांबू आणि उद्याचा सामना पाहून जाऊ.” दरम्यान, उभय संघांतील हा सामना एडिलेडच्या ओव्हल स्टेडियवर खेळला गेला. शनिवारी (5 नोव्हेंबर) याच मैदानावर नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यातील महत्वाचा सामना खेळला जाईल. श्रीलंका सध्या ग्रुप दोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी जर हा सामना जिंकला, तर त्यांचे उपांत्य सामन्यातील जागा पक्की होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शनिवारीच इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरणार आहे. ग्रुप एकमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सध्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध जर विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसणार आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे उपांत्य सामन्यात खेळण्याचे स्वप्न भंगेल. ग्रुप एकमधील न्यूझीलंड संघाने शुक्रवारीच आयर्लंडला पराभूत करून उपांत्य सामन्यात जागा पक्की केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: विश्वचषकातून बाहेर पडताच गंभीर आरोप लावत नबीने सोडले अफगाणिस्तानचे कर्णधारपद
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल