टी20 विश्वचषक 2024 चा 18वा सामना आज (9 जून) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात झाला. गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडाचा तब्बल 134 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजचा या वर्षातील हा सलग सहावा विजय आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 173/५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दुबळा युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिज संघाचा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2014 च्या विश्वचषकात मीरपूर येथे पाकिस्तानविरुद्ध 84 धावांनी विजय मिळवला होता.
वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला अकिल हुसेन. त्यानं 4 षटकात 11 धावा देत 5 बळी घेतले. टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अकीलनं 2014 सॅम्युअल बद्रीनं बांगलादेशविरुद्ध केलेल्या 4/15 च्या कामगिरीला मागे टाकलं.
या सामन्यात युगांडाचा संघ टी20 विश्वचषकात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवण्याच्या जवळ होता. 2014 टी20 विश्वचषकात नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध 39 धावांवर ऑलआऊट झाला होता. युगांडानं नेदरलँडच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकूणच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम ‘आयल ऑफ मॅन’च्या नावावर आहे. 2023 मध्ये स्पेन विरुद्धच्या सामन्यात ‘आयल ऑफ मॅन’ संघ अवघ्या 10 धावांवर ऑलआऊट झाला होता.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सनं सर्वाधिक 44 धावा केल्या. आंद्रे रसेलनं 17 चेंडूत 30 धावांची शानदार खेळी केली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 173/5 धावा केल्या. युगांडासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ब्रायन मसाबा होता, ज्यानं 2 बळी घेतले.
गोलंदाजीत वेस्ट इंडिजच्या अकील हुसेननं संपूर्ण युगांडा संघाचं कंबरडं मोडले. एकवेळ युगांडाचे 8 फलंदाज 25 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. आता टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होईल, असं वाटत असताना जुमा मियागीनं 13 धावा करत संघाला या नामुष्कीपासून वाचवलं. वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेनशिवाय अल्झारी जोसेफनं 2 बळी घेतले. तर रोमारियो शेफर्ड, आंद्रे रसेल आणि गुडोकाश मोती यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
टी20 विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या
39 – नेदरलँड विरुद्ध श्रीलंका, चटगाव, 2014
39 – युगांडा विरुद्ध वेस्ट इंडिज, प्रोव्हिडन्स, 2024
44 – नेदरलँड विरुद्ध श्रीलंका, शारजाह, 2021
55 – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, दुबई, 2021
58 – युगांडा विरुद्ध अफगाणिस्तान, गयाना, 2024
टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा विजय (धावांच्या अंतराने)
172 – श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग, 2007
134 – वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा, प्रोव्हिडन्स, 2024
130 – अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह, 2021
130 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, ओव्हल, 2009
125 – अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा, प्रोव्हिडन्स, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
ॲडम झम्पाचा कहर, ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दम काढला; गतविजेत्यांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका
डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट
“तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का”, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रिषभ पंत काय बोलून गेला?