टी-२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेबर) भारत आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने विश्वचषकातील त्यांचे विजयाचे खाते उघडले.या सामन्यात अफगाणिस्तान संघ पूर्णपणे अपयशी ठरलेला पाहायला मिळाला. दरम्यान सामन्यात अनेक क्षण असे आले, ज्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. असाच एक क्षण भारताच्या डावाच्या १९ व्या षटकात पाहायला मिळाला. या षटकात हार्दिक आणि यष्टीरक्षक मोहम्मद शहजाद एकमेकांना जाऊन धडकले.
भारताच्या डावाच्या १९ व्या षटकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक गोलंदाजी आला होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटवर नीट बसला नाही. चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नसल्यामुळे तो हवेत उडाला आणि नजीबच्या दिशेने गेला. नजीब मात्र, हा झेल घेऊ शकला नाही.
नजीबने हा झेल सोडल्याचे पाहून हार्दिक पांड्या दुसरी धाव घेण्यासाठी धावला. स्ट्राइकवर वेळेवर पोहोचण्याच्या नादात तो अफगाणिस्तानचा वजनदार यष्टीरक्षक मोहम्मद शहजादला जाऊन धडकला. दोघांमध्ये जोरदार टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये धडक झाल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या बाजूला जाऊन पडले.
या घटनेनंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद अगदी लहान मुलासारखा रागावलेला दिसला. त्याने त्याच्या हातातील ग्लोव्जही काढून फेकलेले पाहायला मिळाले. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/reel/CV0dPiXovHc/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. पण भारतीय फलंदाजांनी तो निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये दोन विकेट्सच्या नुकसानावर २११ धावांचे मोठे
आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि भारताने सामना जिंकला. भारताच्या विजयामध्ये सलामीवीर रोहितच्या ७४ आणि केएल राहुलच्या ६९ धावांचे महत्वाचे योगदान होते. याव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने ३५ आणि रिषभ पंतने २७ धावांची नाबाद खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’चा विक्रम! रोहितने मॅन ऑफ द मॅच जिंकताच ‘या’ दिग्गजाच्या यादीत सामील
रोहित अन् राहुलचा अर्धशतकी धमाका! चौदा वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाची केलीय बरोबरी
रोहित-राहुल जोडी नंबर एक! चौदा वर्षांपूर्वी सेहवाग-गंभीरचा विक्रम मोडत ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान