संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सध्या टी२० विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकात सुपर १२ फेरीसाठी थेट पात्र ठरलेल्या ८ संघांचे सध्या सराव सामने सुरु असून सोमवारी(१८ ऑक्टोबर) दुबईत भारत विरुद्ध इंग्लंड संघात सराव सामना झाला. या सामन्यादरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियाम लिव्हिंगस्टोन जखमी झाला आहे.
त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून आता स्पर्धेतील त्याच्या उपलब्धीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आधीच इंग्लंड संघाला सॅम करन, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स अशा खेळाडूंव्यतिरिक्त टी२० विश्वचषक खेळावा लागणार आहे. त्यातच लिव्हिंगस्टोनला झालेली दुखापत इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लिव्हिंगस्टोनला इशान किशनचा झेल घेण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली आहे. झाले असे की इंग्लंडने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून इशान किशन सलामीला उतरला होता. यावेळी १५ वे षटक ख्रिस जॉर्डन टाकत होता. त्याने या षटकाचा टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनने मोठा फटका खेळला.
यावेळी डीप मीड विकेटला लिव्हिंगस्टोनने त्याचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण, प्रकाशाच्या समस्येमुळे त्याला तो घेता आला नाही, तसेच या दरम्यान, त्याच्या हाताचे बोट दुखापतग्रस्त झाले. तो त्यावेळी वेदनेने व्हिवळतानाही दिसला.
त्यामुळे इंग्लंड संघाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी त्याला तपासले. त्यानंतर तो फिजिओंसह मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. त्याच्याऐवजी सॅम बिलिंग्स राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला. इंग्लंडकडून सांगण्यात आले आहे की पुढील २४ तासांनंतर त्याच्या बोटावरील सुज उतरल्यानंतर दुखापतीचे मुल्यांकन केले जाईल.
सराव सामन्यात लिव्हिंगस्टोनने केली होती चांगली कामगिरी
लिव्हिंगस्टोनने सराव सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडकडून २० चेंडूत ३० धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारले होते. तसेच त्याने जखमी होण्यापूर्वी गोलंदाजी करताना २ षटकात १० धावा देत १ विकेट घेतली होती. त्याने ही विकेट भारताचा कर्णधार विराट कोहलीची ११ धावांवर घेतली होती.
आता त्याला दुखापत झाल्याने या विश्वचषकातील इंग्लंडच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा सामना २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
भारताचा सराव सामन्यात विजय
इंग्लंडकडून या सामन्यात जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच मोईन अलीने नाबाद ४३ धावांची खेळी केली. तसेच लिव्हिंगस्टोनने ३० धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८८ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताकडून १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या केएल राहुल आणि इशान किशन या दोघांनी अर्धशतके केली. केएल राहुल ५१ धावा करुन बाद झाला. तर इशान किशन ७० धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. तसेच विराट कोहली ११ आणि सूर्यकुमार ८ धावांवर बाद झाले. तर अखेर, रिषभ पंतने नाबाद २९ आणि हार्दिक पंड्याने १२ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने १९ षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावा करुन हा सामना जिंकला.
इंग्लंडकडून डेविड विली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दोन दिग्गज, एक संस्मरणीय क्षण!’, बीसीसीआयने शेअर केलेले धोनी-गेलचे फोटो तुफान व्हायरल
अखेरपर्यंत रंगला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सराव सामना; कांगारूंचा नाट्यमय विजय
क्लीन बोल्ड! शमीच्या अप्रतिम चेंडूने उडवला धोकादायक बटलरचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ