भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर विरोधी संघांमध्ये टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) आमना सामना झाला. या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केले आहे. पकिस्तानने या सामन्यात त्यांची एकही विकेट न गमावता मोठा विजय मिळवला आहे. त्यांचा वेगावान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. आफ्रिदीला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर निवडले गेले.
आफ्रिदीने या सामन्यात भारतीय संघाचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात सलामीवीर रोहित शर्माला बाद करून शून्य धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर आफ्रिदीने त्याच्या दुसऱ्या षटकात सलामीवीर केएल राहुलला बाद करून भारताला दुसरा मोठा झटका दिला. त्यानंतर त्याने त्याच्या शेवटच्या षटकात चांगल्या लयात असलेल्या कर्णधार विराट कोहलीचाही विकेट घेतली आणि भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
यावेळी त्याने भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळाल्यामुळे तो आनंदी असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आम्ही भारताला हरवले आणि आम्हाला यावर अभिमान आहे. मला माहित होते की, जर आम्ही सुरुवातीला विकेट्स मिळवल्या तर, हे आमच्यासाठी चांगले राहिल. माझा प्रयत्न जास्तीत जास्त स्विंग मिळवण्याचा होता. याच गोष्टीचा अगदी कालसुद्धा मी नेटमध्ये सराव केला होता. नव्या चेंडूला खेळणे अवघड होते, त्यामुळे बाबर आणि रिझवानला याचे श्रेय जाते.”
जेव्हा भारताने १५१ धावा केल्या तेव्हा आम्हाला माहीत होते की, सुरुवातीचे षटके खेळण्यामध्ये थोडी अडचण होईल. त्यानंतर फलंदाजी सोपी होईल आणि ज्याप्रकारे बाबर आणि मोहम्मद रिझवानने फलंदाजी केली त्याचे कौतुक केले गेले पाहिजे, असेही आफ्रिदी पुढे बोलताना म्हणाला.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धाना केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल फलंदाजीला उतरल्या पाकिस्तानकडून बाबार आझम आणि मोहम्मद रिझवानने विकेट न गमावता १७.५ षटकात पाकिस्तानला विजय मिळवून दिला. बाबरने नाबाद ६८ आणि रिझवानने नाबाद ७९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –