टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत रविवारी(२४ ऑक्टोबर) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली आणि श्रीलंकेपुढे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही चांगली फलंदाजी केली आणि १८.५ षटकांमध्ये सामन्यात विजय मिळवला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांच्या मोहम्मद नईम(५२ चेंडूत ६२ धावा) आणि मुशफिकुर रहीमने(३७ चेंडूत ५७ धावा) अर्धशतकी खेळी केली आणि संघाला या समाधानकारक धावसंख्येपर्यंत घेऊन गेले. मोहम्मदने केलेल्या धावांमध्ये त्याने मारलेल्या सहा चौकारांचा समावेश होता, तर रहीमने केलेल्या धावांमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवातच काही चांगली राहिली नव्हती. त्यांचा सलामीवीर कुसल परेरा अवघ्या एका धावेवर बाद झाला. पण, त्यानंतर चरित असलांका आणि पथुम निसांका यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेचा संघ डगमगला आणि संघाची धावसंख्या चार विकेट्सच्या नुकसानावर ७९ धावा अशी होती. त्यावेळी बांगलादेश संघ सामन्यात पुनरागमन करेल असे चित्र निर्माण झाले होते.
पण, त्यानंतर श्रीलंकेच्या चरित असलांका आणि भानुका राजपक्षेने ५ व्या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी केली. राजपक्षेने ३१ चेंडूत ५३ धावा केल्या. यामध्ये त्याने तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तसेच असलांकाने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. यामध्ये त्याच्या पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना १९ षटकांच्या आतच सहज जिंकला. याव्यतिरिक्त बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे
भर मैदानात राडा! बांगलादेशच्या फलंदाजाला भिडला श्रीलंकन गोलंदाज, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये रंगला ‘मीम्स वॉर’; ‘मौका-मौका’ सोशल मीडियावर ट्रेंड